पान:Yugant.pdf/234

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / २१७
 


 इंद्र, सूर्य, रुद्र ह्या देवता मानल्या होत्या व त्यांना हविर्भाग पोहोचवणारा अग्नी होता. स्वर्गाची वा इंद्रलोकाची कल्पना होती. नरकाची कल्पना इतकी स्पष्टपणे आलेली नाही पण ती असावी. पितृश्राद्ध होते. पुनर्जन्मावर व कर्मावरही विश्वास होता. त्याचबरोबर आत्मानात्मविचार व धर्म काय, अधर्म काय हाही विचार वारंवार येतो.
 धर्माचा पदोपदी एवढा ऊहापोह होऊनही धर्माच्या व्याख्या, कृती, खप व अंतरंग स्पष्ट झालेलेच नाही. महाभारतात आढळणारा तात्त्विक ऊहापोहातील हा कणखरपणा पुढे राहिला नाही. भक्तिमार्गाने सगळेच विचार बोथट झाले. काही दृष्टींनी मात्र धर्माचे साधारण स्वरूप तसेच राहिले. त्या धर्मातून निघणारे संप्रदाय बौद्ध, जैन, शैव, वैष्णव हे वगळले, तर हिंदूंचा धर्म अनामिक, लवचिक व व्यक्तिगतच राहिला.त्याला नाव दिले ते परकीयांनी, तोपर्यंत त्याला नावही नव्हते. आजही प्रत्येक विचारी हिंदूला धर्माचे पूर्ण स्वरूप सांगणे शक्य नाही. ‘मला काय वाटते, ते सांगतो', असेच तो म्हणेल. आपली ही अगतिकता अनुभवली म्हणजे ठामपणे हिंदू धर्माचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या पाश्चात्यांच्या प्रज्ञेचे व धार्ष्ट्याचे कौतुक वाटते.
 प्रत्येक प्रसंगी धर्म काय,अधर्म काय, ह्याची संवादात्मक चर्चा महाभारतात जितकी झाली आहे तितकी दुसऱ्या कोठच्याही पुस्तकात झालेली नाही. इतर पुस्तकांतून उदा. बायबल व कुराण.. धर्म काय ते ठाम सांगितले आहे. त्यावर संशय उत्पन्न होऊ दिलेला नाही. पण तशा तऱ्हेचे विवरण महाभारतात येत नाही. महाभारताची गोष्ट मनाचा ठाव घेते, ही ह्यामुळेच. मानवजीवित क्षणभंगुर आहे, असार आहे,त्याला काही अर्थ नाही, व्यक्ती एकटी आली, ती एकटी जाणार, अशा तऱ्हेची विचारसरणी व तीवर आधारलेले वैफल्यमय विदारक वाङ्मय फ्रान्स, इंग्लंड व अमेरिका येथे गेल्या २५-३० वर्षांत विशेष झाले आहे.