पान:Yugant.pdf/231

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४/ युगान्त


विचित्रवीर्याच्या मरणानंतर त्याला राज्यावर बसण्याची गळ घालण्यात आली, भावांच्या विधवांच्या ठिकाणी संतती निर्माण करावी, म्हणून त्याला विनंती केली गेली, पण त्याने दाद दिली नाही. कुळधारणेसाठी त्याने गौण मार्ग पत्करला, पण स्वतःची प्रतिज्ञा मोडली नाही. कुटुंब व कुलरक्षण करण्याच्या कर्तव्यापेक्षा- लोकदृष्टीने ते एक कर्तव्यच होते,- त्याला स्वतःच्या वचनाचे बंधन अधिक वाटले. अंतिम मूल्य तात्कालिक वा चिरकालिक, उपयोगी आहे वा नाही, हा विचार त्याने केला नाही. ते मूल्य हा त्याच्या स्वत्वाचा भाग झाला होता व ते त्याने टिकवले. मूल्यांची एक अंतिम मर्यादा भीष्माने दाखवली.
 समाजव्यवस्थेचाच एक भाग म्हणून त्या वेळच्या राजकीय स्थितीचे वर्णन देता येईल. 'कृष्ण वासुदेव' ह्या लेखात त्याचा उल्लेख आलाच आहे. राज्ये लहान-लहान व रानांनी वेढलेली अशी होती. प्रत्येक राज्यावर वंशपरंपरा आलेल्या घराण्यातील पुरुष बसलेला होता. बरीच राज्ये जिंकून, त्यांचा प्रदेश काबीज करून साम्राज्य स्थापण्याची प्रथा नव्हती. जरासंध सम्राट होता. त्याने उत्तरेकडची व पश्चिमेकडची राज्ये काबीज केल्याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. कर्ण अंगाचा राजा होता.त्यावरून जरासंधाने मगधाशेजारचीही राज्ये जिंकली नाहीत, असे स्पष्ट होते. पण तो सारखा लढाईत गुंतलेला होता. त्याने बऱ्याच राजांना कैद केले होते असे दिसते. तो अतिशय बलाढ्य व भारी होता. यादव, मत्स्य वगैरे लोकांना त्याच्या भीतीने आपला मुलूख सोडावा लागला, त्यावरून त्यांचा प्रदेश त्याने जिंकला असला पाहिजे असे अनुमान निघते. त्याला मारल्याशिवाय धर्माला राजसूय करणे शक्य नव्हते. राजसूय यज्ञ म्हणजे सम्राटपदाचे* द्योतकच होते. पण ते मिळवताना धर्माने कोणाचे राज्य घेतले नव्हते. बरोबरीच्या राजांत शौर्याने, औदार्याने व गुणांनी जो पहिला, तो राजसूय यज्ञ करी. काही राजे जिंकून, काही वश करून, काही मित्रत्वाने व काही सोयरे-संबंधी म्हणून सर्वांकडून मान्यता मिळाल्यावर राजसूय होई.


* 'सम्राट' ह्या शब्दाचा मूळचा अर्थ 'चांगला राजा' असा आहे.