पान:Yugant.pdf/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २१३
 

गोष्ट होती. माद्रीमागून माद्रीच्या मुलांना सावत्रआईने व भावांनी विलक्षण आपलेपणाने वागवले होते. तेव्हा झाल्या गोष्टीवरून राग करण्यासारखे काहीच नव्हते. ह्या बाबतीत आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मद्र- बाल्हीकांचेच हस्तिनापूरच्या घराण्याशी असलेले पिढीजाद संबंध. प्रतीपाची एक राणी मद्रांची राजकन्या होती. तिचा मुलगा मामाघरी दत्तक गेला होता. तो शंतनूचा सावत्रभाऊ. त्याचा नातू वा पणतू, सौमदत्ती कौरवांच्या दरबारात असे व तो कौरवांच्या बाजूने लढला. हा सौमदत्ती शल्याचा काका असावा. जिकडे वडील माणसे तिकडे आपण, अशी शल्याची वृत्ती असावी. म्हणजे शल्य पांडवांवर रागावला, किंवा भाच्यांना बेइमान झाला असे म्हणता येणार नाही. ही लढाईच अशी विचित्र होती की, न्याय कोणता, अन्याय कोणता, ह्यापेक्षा जवळचे कोण, लांबचे कोण, ह्यावरच कोण कुठून लढले, हे ठरवावे लागेल. वास्तविक हीच लढाई नाही, जगातील सर्वच लहानमोठ्या लढाया अशाच असतात. सर्व न्याय एका बाजूस सर्व अन्याय दुसऱ्या बाजूस, असे नसतेच.
 महाभारतात तिसरा एक प्रसंग असा आहे की, मूल्यांचा प्रश्न परत एका तीव्रतेने पुढे येतो. पितृभक्ती हा सर्वात मोठा गुण व पितृकुल सावरायचे, संभाळायचे, हे मोठे कर्तव्य, अशी त्या वेळच्या समाजांची मूल्ये होती. पण मूल्यांची मर्यादा काही दृष्टींनी फारच व्यापक, म्हणजे कुटुंबापलीकडे वा एखाद्या विशेष समाजापलीकडे असते, तर दुसऱ्या दृष्टीने ती सर्वस्वी व्यक्तिगत असते. भीष्माच्या चरित्रात न्याय, अन्याय वगैरेंना फारसे महत्त्व नाही. कुलरक्षण ही त्याला जबाबदारी वाटत होती. पांडवांची बाजू न्यायाची, का कौरवांची बाजू न्यायाची, ह्या वादात तो विदुराइतका खोल शिरला नाही. थोरल्या घराचे त्याने रक्षण केले. तिथे तो वाढला, लढताना उघड-उघड तरी तो त्या बाजूने लढला, लढायला उभे राहण्याचे नाटक केले. बापासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यात पितृभक्ती दाखवली.