पान:Yugant.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ३

म्हणाला, “बाई, बायको व्हायचे, तर डाव्या मांडीवर बसायचे. तू बसली आहेस उजव्या मांडीवर. ती असते मुलाची, नाही तर सुनेची. तेव्हा आता मला मुलगा होऊ दे; त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगतो." गंगेने ते ऐकले. प्रतीपाला शंतनू झाला. प्रतीप राज्य त्याच्या स्वाधीन करून निघून गेला. शंतनू शिकार करण्यात गुंग असे. कुरुवंशात व इतरही राजघराण्यांत शिकार करणे हा क्षत्रियांचा एक मोठा छंद असे. एकदा त्याला गंगेच्या काठी एक अप्रतिम रूपवती स्त्री दिसली व त्याचीच शिकार झाली. ती गंगा होती. शंतनूची लग्नाची बायको होण्यास तिने रुकार दिला, पण इतर स्वर्गीय स्त्रियांप्रमाणे- उर्वशीप्रमाणे तिने विचित्र अटी घातल्या. “राजा, मी वाटेल ती कृत्ये करीन. तुला अयोग्य वाटेल असेही करीन; पण तू मला अडथळा आणता कामा नये, वा नावे ठेवता कामा नये. ज्या दिवशी तसे करशील, त्या दिवशी मी तुला सोडीन." कामी शंतनूने सर्व मान्य केले व गंगा त्याच्याजवळ राहिली. गंगेने शंतनूला सर्व प्रकारचे सुख दिले, असे महाभारत म्हणते. मूल झाले रे झाले, की ती त्याला गंगेत नेऊन बुडवायची. शंतनू इतका तिच्या आधीन होता की, त्याला काही म्हणवले नाही; पण आठव्या मुलाला जेव्हा ती बुडवायला निघाली तेव्हा त्याला राहवले नाही. “ह्याला तरी मारून टाकू नकोस! काय अघोरी कृत्य करणारी स्त्री तू आहेस !" असे तो म्हणाला. गंगेला तेवढेच निमित्त पुरे होते. हा मुलगा मी जिवंत ठेवते, पण आपल्या अटीप्रमाणे मी आता तुला सोडून देते.” असे म्हणून मुलाला घेऊन ती अंतर्धान पावली.
 ना मूल, ना बायको; शंतनू परत मृगया करीत रानात वणवण फिरत राहिला. एक दिवस सर्व शास्त्रे शिकलेला, मोठा झालेला असा त्याचा मुलगा गंगेने त्याच्या स्वाधीन केला. शंतनूने त्याला राजधानीत आणून यौवराज्याभिषेक केला. हा देवव्रत