पान:Yugant.pdf/229

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१२ / युगान्त

'नियोग' हा शब्द दुसरीकडे येत नाही. ह्याची उत्तरे दोन संभवतात... १) जरा अपप्रकार होत होता, त्याला एक रूढ शब्द वापरून झाले ते योग्यच, तो आपद्धर्मच होता, असे दर्शवायचे होते, किंवा २) 'नियोग' ह्या शब्दाला निश्चित असा अर्थ प्राप्त झाला नव्हता. स्त्रीच्या ठायी अमक्यानेच संतती निर्माण करावी, असा दंडकही रूढ झाला नव्हता.
 ह्यांपैकी कोठचा पर्याय स्वीकारायचा, हे सध्याच्या आवृत्तीवरून कळणे शक्य नाही. सध्याची आवृत्ती ज्या हस्तलिखितांची तपासणी करून सिद्ध केली आहे, त्यांतले जुन्यात जुने इ.स. ९०० किंवा १०००च्या पाठीमागचे नाही. आता सिद्ध झालेल्या आवृत्तीची आतून मजकुराची तपासणी होऊन जेव्हा नवी आवृत्ती सिद्ध होईल, तेव्हा असल्या प्रश्नांचा निकाल लागेल, एरवी नाही.
 दुसरी घटना म्हणजे शल्य आपल्या भाच्यांच्या बाजूला न लढता कौरवांना मिळाला ही. ह्या बाबतीत पहिली अडचण आहे ती शब्दांच्या अर्थाबद्दल. महाभारतात भाऊ, बहीण, बाप, आई वगैरे नातेवाचक शब्द सबंध एका तऱ्हेच्या नातेवाईकांना लावले आहेत, असे वरती दाखवलेच आहे. म्हणजे भाऊ सख्खा, की सावत्र, की चुलत, हे संदर्भाशिवाय काहीच कळत नाही. शल्य हा माद्रीचा सख्खा भाऊ होता की खूप लांबचा चुलतातला होता, हे समजत नाही. बहिणीच्या दुर्दैवी मरणाबद्दल शल्याचा पांडवांवर राग होता म्हणावे, तर तसेही काही दिसत नाही. तशा तऱ्हेचा एकही उल्लेख महाभारतात नाही व दुसरे म्हणजे जी घटना आपल्याला दुर्दैवी व विशेष म्हणजे संताप आणणारी वाटते, तशी ती शल्याला त्यावेळी वाटली असेल असे संभवत नाही. मद्रांनी आपली मुलगी खूपसे धन घेऊन एका अभिषिक्त राजाला धाकटी राणी म्हणून जाणून-बुजून सवतीवर दिली होती, तिला मुलेही झाली होती. ती नवऱ्यामागून सती गेली, ही तिने आपणहून केलेली इतर कित्येक क्षत्रिय स्त्रिया करीत त्याप्रमाणे केलेली