पान:Yugant.pdf/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २११
 

अशीही मूल्ये असतात. पण तीही एका काळाची मूल्ये दुसऱ्या काळाला तोकडी वाटू लागतात. द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळी अशाच तऱ्हेच्या व्यापक मूल्यांचा प्रश्न होता. यक्षप्रश्न-प्रकरणात ह्या व्यापकतेचा पडताळा येतो. सर्व मनुष्यांना लागू म्हणून एक धर्म होताच. पण तो खांडवदाहप्रसंगी कृष्णार्जुन विसरले, असे आज आपण म्हणतो. त्यांना त्यावेळी तसे वाटले नाही. "दया करी जे पुत्रासी तेचि दासा आणि दासी" असे परमवैष्णव, तुकारामबुवा म्हणतात. पण आजचा मनुष्य म्हणेल, 'दास आणि दासी ह्या शब्दांनी व्यक्त झालेले दास्य समाजात असावे हाच अन्याय नाही का?' हा न संपणारा वाद आहे. अजूनपर्यंत तरी सर्व व्यक्तींना ज्या समाजात, न्याय व समता मिळाली, असा समाज उत्पन्न झाला नाही, हे कोणाही विचारी व्यक्तीला पटेल. असा समाज स्थापणे शक्य आहे का, ह्या प्रश्नाचे उत्तर येथे देण्याची गरज नाही.
 ह्या संदर्भात महाभारतातील काही घटनांचा विचार करणे रास्त होईल. धृतराष्ट्र आणि पांडू हे विचित्रवीर्याच्या विधवा राण्यांचे मुलगे नियोगाने झालेले असे म्हटले आहे. स्मृतींमध्ये 'नियोग' म्हणजे थोरल्या भावाच्या विधवेच्या ठायी धाकट्या भावाने पुत्रोत्पत्ती करणे असा आहे. व्यास सत्यवतीचा थोरला मुलगा, म्हणजे विचित्रवीर्याचा थोरला सावत्रभाऊ होतो. म्हणजे स्मृतींप्रमाणे संतती निर्माण करण्याचा हा प्रयोग 'नियोग' ह्या क्रियेत बसत नाही. त्याला दीर म्हणून नव्हे, पण एक ब्राम्हण म्हणून 'नियुक्त' केला, म्हणून 'नियोग' असे म्हणावे, तर

"कौसल्ये देवरस्तेऽस्ति सोऽद्य त्वानुप्रवेक्ष्यति।
अप्रमत्ता प्रतीक्षेनं निशीथे आगमिष्यति॥"

हे सासूचे बोलणे केवळ सुनेची फसवणूक करण्यासाठी होते का? उद्योगपर्वात कर्णकुंती-संवादाच्या वेळी कुंतीला कुवारपणी मूल होण्याच्या प्रकारालाही 'नियोग' हा शब्द योजिला आहे. ह्या अर्थाने