पान:Yugant.pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१०/ युगान्त

भांडण नको. जो वाटा मागेल त्याला बऱ्या बोलाने वाटा मिळाला नाही तरी चालेल. त्याने गप्प बसावे, पण वाट्यासाठी तटून बसू नये, असाच सूर. पण सोयरे मात्र आपल्या जावयासाठी, मेहुण्यासाठी धडपडत. पांडवांचे सर्व मदतनीस सोयरेच होते. यादव आईच्या माहेरचे, द्रुपद बायकोच्या माहेरचे व विराट सुनेच्या माहेरचे. आपल्या बहिणीच्या आंधळ्या नवऱ्यासाठी व भाच्यांसाठी जीव टाकणारा गांधारराज शकुनी कौरवांकडे होता, तोही सोयराच !
 हे पितृप्रधान कुटुंब त्या वेळच्या समाजाचा आधारस्तंभ होते. सामाजिक मूल्ये समाजधारणेसाठी असतात. अशा कटुंबांचा परिपोष व्हावा, अशाच तऱ्हेची मूल्ये त्या समाजाचीही होती. पुरुषांचे मुख्य गुण पितृभक्ती व सौभ्रात्र हे होते. पितृप्रधान कुटुंब सुस्थिर रहायला, भांडणे टाळण्यास ह्या गुणांची आवश्यकता होती. ह्या कुटुंबात कायम राहायला येणाऱ्या स्त्रिया परघरच्या असत. त्यांच्यामध्ये पितृभक्ती किंवा सौभ्रात्र ह्या दोन्ही गुणांची अपेक्षा नव्हती. त्यांची पितृभक्ती लग्न झाले नाही तोवरची, पितृकुलाचे मोठेपण साधण्यासाठी. पण एकदा का लग्न झाले, म्हणजे माहेर तोडून सर्वस्व पतीसाठी वेचणे, व त्याच्या कुळाच्या मोठेपणासाठी जपणे ही तिची कर्तव्ये होती. आई म्हणून मुलांना संभाळणे, पत्नी म्हणून पती नेईल तिकडे जाणे व सून म्हणून सासू-सासऱ्यांची सेवा करणे ही तिची मुख्य कर्तव्ये होती. सामाजिक मूल्ये ही त्या-त्या समाजाच्या गरजेवर बहुतांशी आधारलेली असतात. देशकाल-निरपेक्ष मूल्ये असू शकतात का, असा एक प्रश्न ह्या लेखाच्या अनुषंगाने (कृष्ण वासुदेवाबद्दल) निघाला होता. सर्वस्वी देशकाल-निरपेक्ष मूल्ये असूच शकत नाहीत, अशी आपल्या तत्त्वज्ञानाची भूमिका आहे. ती तर्ककर्कश असली तरी रास्त वाटते. ह्याबद्दल पुढे उल्लेख येईल. सध्या एवढेच सांगता येईल की, एका विशिष्ट वर्गाची, विशिष्ट कुटुंबपद्धतीला पोषक अशी मूल्ये जशी असतात, तशीच सर्व-साधारणपणे मानवजातीला लागू पडतील,