पान:Yugant.pdf/226

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त /२०९
 

तो पुढे म्हणतो, "तेही निःसंशय माझेच मुलगे आहेत; पण दुर्योधन माझ्या शरीरापासूनचा आहे. दुसऱ्यासाठी स्वतःचा देह सोड, असे समानता शोधू पाहणारा कोणता शहाणा म्हणेल ?" म्हाताऱ्याच्या सर्व मुलांना मारून धर्म परत त्यांना 'तात' व 'अम्ब' म्हणत राहिलाच. हे शब्द म्हणताना कित्येक वेळी त्याची जीभ अडखळली असेल, असे काही प्रसंगी तरी वाटतेच. आजही कुटुंब पितृप्रधान व सामायिक आहे पण सख्खे व चुलत हा भेद सर्व उत्तर-भारतीय भाषांत स्पष्ट केलेला आहे.
 महाभारतकाळी 'पतिव्रता' ह्या शब्दाचा अर्थ काही दृष्टींनी पुढच्या काळापेक्षा निराळा होता. त्या वेळी औरस संतती नसली, तर नियोगाने पुत्रोत्पत्ती हा मार्ग दत्तक घेण्यापेक्षा जास्त चांगला समजत. नंतरच्या काळात नियोग मागे पडला, व दत्तक घेण्याचा प्रघात सर्रास सुरू झाला. ह्यामुळे स्त्रीला जास्त मान मिळाला असे मात्र होत नाही. पूर्वी स्त्री ही 'क्षेत्र' होती. तिला नवरा सांगेल त्याच्यापासून पुत्रोत्पत्ती करून घ्यावी लागे. पुढच्या काळी ही सक्ती नाहीशी झाली, पण त्याचबरोबर स्त्रीच्या हातून कुवारपणी वा लग्न झाल्यावर काही चूक झाली, तर तिला क्षमा करायची, ही वृत्तीही पार नाहीशी झाली. स्त्रीवर बलात्कार झाला, तर पूर्वीचे क्षत्रिय तिला टाकून देत नसत. त्यानंतरचा हिंदू समाज मात्र पावित्र्याच्या - फक्त स्त्रियांच्याच पावित्र्याच्या- बाबतीत इतका हट्टी व संकुचित, बनला की, तो आपल्या स्त्रियांना रक्षूही शकला नाही, वा परत आपल्यात घेऊही शकला नाही. आजतागायत ही भयंकर वृत्ती कायमच आहे, हे फाळणीच्या प्रसंगी प्रत्ययास आलेच!
 ज्यात आपला जन्म झाला, ते कुटुंब व ज्यांच्याशी सोयरीक झाली, ती इतर कुटुंबे अशा दोन विश्वांत आयुष्य सामावलेले होते. बापाचे कुटुंब ते मुख्य. पण त्यातच भांडणे निघाली, म्हणजे भांडणात सोयरे मदत करीत. स्वकुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांची भांडण टाळण्याकडे प्रवृत्ती. अन्याय झाला तरी चालेल, पण उघड