पान:Yugant.pdf/224

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २०७
 

काढता येईल की निरनिराळ्या व्यक्तींना किंवा समूहांना आपल्या जातीतून क्षत्रियवर्णात जाणे जरी यशस्वीपणे करता आले, तरी प्रत्येक वर्णात १) जुनी प्रतिष्ठित घराणी, २) जुनी प्रतिष्ठित पण मांडलिक व मातब्बर नसलेली घराणी व ३) नव्याने आत शिरू पाहणारी वा शिरलेली मातब्बर नसलेली घराणी असत. घराण्यांचा समूह आपापले वैशिष्ट्य टिकवी. फक्त नव्या आलेल्या घराण्यांना जुन्यांशी शरीर-संबंध जोडून आपण मुळापासून क्षत्रिय आहोत, वा ब्राह्मण आहोत, असा दावा करायचा असे. वर्णांतर्गत उच्च-नीच, नवे-जुने असे गट असत. व्यक्ती किंवा जाती वरच्या वर्गात जायची धडपड करीत, त्यावेळी त्या वर्गातील जुन्या सर्वांनी प्रमाणित मानलेल्या कुटुंबात लग्नसंबंध करण्याचे त्यांचे प्रयत्न असत असे दिसते. जाती व वर्ण ह्यांच्यामधील अशा तऱ्हेचे संबंध भारताच्या सगळ्या इतिहासात दिसतात. सर्व जगभर सर्वच समाजात सर्वकाळ चाललेल्या एका सामाजिक प्रक्रियेचेच हे भारतीय उदाहरण समजता येईल. एका वर्णात पुष्कळ जाती का असतात, त्याचे हे एक कारण देता येईल. वर्णसंकराबद्दल ओरडा जसा सनातन, तशीच वर्णसंकर ही क्रियाही सनातनच.
 वर्ण व जाती असलेल्या समाजाचे महाभारतातील चित्र फार उठावदार नाही. वर्ण दृढ होते, जाती अस्तित्वात होत्या, वैश्यांची कृत्ये पुढच्या काळातील शूद्रांची होती, इतक्याच गोष्टी सांगता येतात. ह्याउलट महाभारतातील कौटुंबिक चित्र फारच उठावदार, बारकाव्यांनी भरलेले व आजतागायत रूढ असलेल्या पितृप्रधान कुटुंबाचे प्रातिनिधिक आहे. हे चित्र इतके तपशीलवार आहे की, यामुळे त्यात पुढे पडलेले लहान-मोठे फेरफारही लवकर समजू शकतात. आजतागायत बहुतेक हिंदुस्थानभर रूढ असलेले पितृप्रधान सामायिक कुटुंब महाभारतात वर्णिलेले आहे. हस्तिनापूरच्या कुरुंचे ,पांचालातील द्रुपदांचे व द्वारकेतील यादवांचे असेच कुटुंब होते. एका वेळी कुटुंबात चार-चार पिढ्यांचे लोक असत. ह्या कुटुंबातील