पान:Yugant.pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०६ / युगान्त

व वर्णसंस्था ह्यांचा एक विशेष महाभारत कथेतही दिसतो. खालच्या जाती बहुधा वरच्या वर्णांत जाऊ इच्छितात, फक्त एका जातीतून दुसरीत जायचा प्रयत्न नसे. सर्व जाती वा वंश ह्यांचे स्थान नक्की झालेले दिसत नाही. नागकुलांना- विशेषतः त्यांतील राजघराण्यांना बराच मान असे, पण त्यांना कोठच्या वर्गात स्थान होते, ते कळत नाही. बरीच राजघराणी क्षत्रिय नसूनही पुढच्या कालात स्वतःला 'क्षत्रिय' म्हणवून घेऊ लागली; पण बौद्ध-कालातही अशा प्रयत्नांना यश मिळत नसे व राजा असूनही क्षत्रिय नसलेल्या बलशाली राजालासुद्धा क्षत्रियकन्या मिळत नसे, हे पसेनदी कोसल व वासभखत्तिया ह्यांच्या गोष्टीवरून दिसून येते. पुढील काळात दिसून येणारी वर्ण व जाती ह्यांची व्यवस्था व खालच्या जातींची वरच्या वर्णांत जाण्याची धडपड व बऱ्याचदा यशस्वी झालेले प्रयत्न हे भारतीय समाजाचे आजपर्यंत दिसणारे अंग भारतीय युद्धाच्या काळात दृढमूल होऊ लागले होते. भारतीय युद्धाच्या वेळी क्षत्रिय म्हणवणारी घराणी बऱ्याच पूर्वीपासून अस्तित्वात होती. भारतीय कथेवरून पाहता क्षत्रिय घराणी आपल्या क्षत्रियत्वाला फार जपत होती, व त्याच-बरोबर एकमेकांच्या परंपरागत आलेल्या राज्यांना व क्षत्रिय समाजाच्या अशा विशिष्ट बांधणीला जपत असत. क्षत्रिय लहानशा का होईना, पण एकेका प्रदेशाला चिकटून होते. ह्याच्या उलट ब्राह्मण इतरांच्या आश्रयावर अवलंबून असल्यामुळे ह्या राज्यातून त्या राज्यात जात असत. नाना प्रदेशांशी, राजसभांशी त्यांचा संबंध येईच, पण नागांशी व अरण्यातून राहणाऱ्या इतर लोकांशीही त्यांचा संबंध येई व शरीरसंबंधही घडे. त्यापासून निर्माण झालेली ही प्रजा बऱ्याचदा ब्राह्मण गणली जाई. क्षत्रियांतही संकर होत होता, पण तो ब्राह्मणांइतका नव्हता असे कथेवरून दिसते.
 राजा असूनही क्षत्रिय नाही, असे कर्णाचे उदाहरण. लगेच पुढील काळातील पसेनदीचे उदाहरण. ह्यांवरून असे अनुमान