म्हणजे राजा, धार्मिक विधी करणारे ब्राह्मण व वैश्य ही मुख्य प्रजा, अशी समाजरचना होती; व ज्यांना कोणतेही हक्क नाहीत, ज्यांचे संस्कार वरील तिघांचे नव्हेत, व जे फक्त नोकर, ते शूद्र होते. कृषि व गोरक्षण वैश्यांकडे असल्यामुळे शूद्रांची संख्याही पुढील काळापेक्षा फारच कमी असली पाहिजे. हा समाज प्रामुख्याने त्रैवर्णिक असला, तरी चौथा वर्ण प्रस्थापित झालेला होता व त्याला नावही होते. म्हणून चातुर्वर्ण्यात्मक समाजव्यवस्थेची सुरवात व्हावयाला लागली होती. कृषी, गोरक्ष, वाणिज्य हे करणारा वैश्यवर्ग जाऊन त्याऐवजी व्यापार करणारा धनाढ्य व बलशाली वर्ग स्थापन झाला व कृषिगोरक्ष करणारे हे परिचर्या करणाऱ्या शूद्र पायरीला पोहोचले, हे दृश्य महाभारताच्या काळानंतर उदय पावलेल्या बौद्धयुगामध्ये स्पष्ट दिसते. बौद्ध व नंतरच्या जैन वाङ्मयात वैश्यवर्गाला प्राधान्य आहे. गोष्टींचा नायक हा वीरपुरुष व क्षत्रिय असावा, हा भारतकालीन प्रघात जाऊन तो श्रेष्ठी वा श्रेष्ठीपुत्र होऊ लागला. म्हणूनच बुद्धकथांमध्ये किसा गोतमी व विशाखा अशा वैश्य स्त्रियांची वर्णने आलेली आहेत. श्रीमंत वैश्य गृहस्थाश्रमात असण्याची आवश्यकता सांघिक प्रव्रज्याप्रधान धर्माला असते, असे म्हणता येईल का? प्रव्रज्याप्रधान धर्म पहिल्यापासूनच व्यक्तिपूजेवर आधारलेले असतात. ते सांघिक असतात व म्हणून की काय, धर्मसंस्थेची बांधणीही घट्ट आखीव होते. धर्माचा मुख्य, उपमुख्य, संघमुख्य, संघाचे व व्यक्तीचे जीवन सर्वच बांधले जाते. बौद्ध, ख्रिस्ती, व महंमदीय धर्म असेच होते. घरच्या वाणिज्यावर भागेनासे झाले, तेव्हा ह्या धर्माचे लोक साम्राज्य संस्थापक बनले व धर्माची तत्त्वे जगभर पसरली. बौद्ध धर्म घरच्या-घरी साम्राज्यवादी होता व त्याच्या हजारो भिक्षूच्या पोषणासाठी त्या वेळी श्रीमंत वणिक् वर्गही होता. भारतीय युद्धाचे युग त्या मानाने आकुंचित संबंधित गटांनी व्यापलेले असे दिसते. धर्माला सार्वजनिक स्वरूप नव्हते. जो बांधीवपणा होता, तो समाजाच्या एकसंधपणामुळे; धर्माच्या स्वरूपामुळे नव्हे.धर्म हा शब्द फारच व्यापक व खऱ्या अर्थाने व्यक्तिगतच राहिला.
पान:Yugant.pdf/221
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४ / युगान्त
