पान:Yugant.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२ / युगान्त

नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री- सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडवलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, फोलकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे. हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दुःख आपल्याला खुपत राहते.

 भीष्माचे आयुष्य असेच होते. विरोधाने भरलेले होते, निदान वरून तरी तसे दिसत होते. सुसंगती होती, ती भीष्माच्या मनाची व कृत्यांची. भीष्म जन्माला आला, तो एक शापित जीव म्हणून. त्याच्या बरोबरीच्या इतरांची सुटका गंगेने केली; पण तो मात्र जगात अडकून पडला.

 गंगेला मृत्यूलोकात जाण्याचा काही कारणामुळे प्रसंग आला. त्याच सुमारास अष्टवसूंना वसिष्ठांच्या शापामुळे मृत्यूलोकात जन्म घेणे भाग झाले होते. "गंगे, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो. जन्मल्या-जन्मल्याच तू आम्हांला मारून टाक व आमची सुटका कर," अशी त्यांनी गंगेची प्रार्थना केली. गंगेने त्यांना तसे वचन दिले व हे 'स्वर्गीय' प्राणी पृथ्वीवर निघाले. गंगा स्वर्गातील बाई होती, चिरयौवना होती. तिच्या वयाचा विचार करण्याचे कारणच नाही. ती 'स्वर्गीय' होती, म्हणून तिला मृत्युलोकातील नियमही लागू नव्हते! ही बाई पृथ्वीवर आली आणि थेट राजा प्रतीपाच्या मांडीवर जाऊन बसली, व 'मला तुझ्याशी लग्न करू दे' म्हणून म्हणू लागली. राजा