पान:Yugant.pdf/219

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२०२ / युगान्त
 

ब्राह्मणांच्या मंत्रविद्येवर विश्वास असल्यामुळे व संस्कार त्यांच्या हातून होत असल्यामुळे त्यांना ब्राह्मणांची गरज होती व ब्राह्मणांना क्षत्रियांकडून संरक्षणाची, पुरस्काराची व पोषणाची अपेक्षा होती. हे दोघे ठामपणे एका समाजाचे घटक होते. त्या समाजाच्या दैवतकल्पना एकच होत्या. 'विश्’ वर्गाचे नाव काही वेळेला येते, पण त्या वर्गातील व्यक्तींचे चित्रण नाही. शूद्र वर्गाबद्दलही असेच म्हणता येईल. शूद्र कोण होते? राजकुले दासदासींनी भरलेली होती. सर्व दास व सर्व दासी शूद्र होत्या, असे म्हणायचे का? सुभद्रा गोपालिका- वेष घेऊन 'मी तुमची दासी,' म्हणून द्रौपदीला भेटायला आली. म्हणजे तिने विनयाने शूद्रत्व धारण केले, असा अर्थ होतो का?
 भगवद्गीता आज ज्या स्वरूपात आहे, त्या स्वरूपात ती पूर्वी (युद्धकाली?) नव्हती, म्हणून पुढच्या पुढच्या अध्यायांत जेथे कृष्णाचे देवपण उघड गृहीत धरले आहे तेथे- जे आले आहे, त्याचा दाखला देणे बरोबर होणार नाही. पण पुढच्या कालातला म्हणून धरला, तरी गीतेतील पुढील श्लोक विचार करण्यासारखा आहे. कारण तो पांडवांच्या वेळच्या समाजस्थितीचा निदर्शक आहे; स्मृतीतील समाजस्थितीचा नव्हे. कृषी, गोरक्ष, वाणिज्य अशी कर्म वैश्यांची व परिचर्यात्मक कर्म शूद्राचे (गीताः१८.४४) म्हणून सांगितले आहे. अशाच अर्थाचे दोन श्लोक पुढे कर्णपर्वात शल्याच्या तोंडी आहेत. (८.२३.३५-३६) कृषिवल म्हणजे शेतकरी, गोरक्ष म्हणजे गवळी व वाणिज्य म्हणजे सर्व प्रकारचा व्यापार करणारे, वस्तू तयार करून विकणारे लोक. शेतकरी राजाला कर देत होता. गवळी किंवा गोवारी गोधन बाळगीत. राजधानी स्थापायची म्हणजे निरनिराळ्या दुकानदारांना आणून त्यांना जागा देऊन, करांत सवलती देऊन नव्या राजधानीत त्यांना वसवायची प्रथा होतीसे दिसते. ते वसले, म्हणजे अर्थात करही देत असत. हे लोक परिचर्या म्हणजे एखाद्याची चाकरी करीत असे दिसत नाही.