पान:Yugant.pdf/218

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / २०१
 


 महाभारतकाली काय होते, नंतर काय आले, महाभारतकालात कोणत्या सामाजिक घटनांचा पाया घट्ट रोवला गेला, वगैरेंचे ऊहापोह करण्याआधी महाभारतकाल म्हणजे काय हे स्पष्ट,सांगितले पाहिजे.
 महाभारताचा काल म्हणजे भारतीय युद्ध झाले, त्याच्या अलीकडचा व काही पलीकडचा शतकांचा काळ धरावा लागेल. निदान तसा तो ह्या विवेचनात धरलेला आहे. महाभारतकालाला 'युगान्त' म्हटले आहे. म्हणजे भारतीय युद्धानंतरचा फार-तर एक दोन काळ शतकांचाच अभिप्रेत आहे. पुराणकारांच्या मते तर पांडवांच्या मरणाआधीच कलियुगाची सुरवात झाली होती. महाभारताच्या आधी किती शतके जावे, हा एक कठीण प्रश्न आहे. वेदात दाशराज्ञ युद्धाचा शेवट ते भारतीय युद्धाचा शेवट, असा एक काळ धरावा लागेल, व युगान्त म्हणजे या काळाचा शेवट मानावा लागेल. वेद जरी नाहीत,तरी काही ब्राह्मणे व काही उपनिषदे ह्या काळातली मानावी लागतील.याज्ञवल्क्याचे आपला गुरू व मामा जो वैशंपायन त्याच्याशी झालेले भांडण कधीतरी भारतकथेकाळी झालेले सांगितले आहे. प्रत्यक्ष कथेशी ज्याचा संबंध नाही, असा हा भाग आहे. पण कालदृष्ट्या ते विधान खरे मानले, तर सबंध शुक्ल यजुर्वेद, त्यांची महत्त्वाची ब्राह्मणे (उदा.शतपथ) व ईशावास्यादी उपनिषदे ही भारतीय युद्धानंतरची, बुद्धकाळाला जवळची असे मानावे लागेल. भारतीय युद्धाचा काळ ख्रिस्तपूर्व १००० ते १२०० वर्षे, असे मी मानते.
 भारतीय युद्धाची कथा ही क्षत्रियकुळातील दोन भावांच्या मुलांच्या भांडणांची कथा आहे. क्षत्रियांखेरीज इतर माणसांच्या कथा व उल्लेख दुय्यम आहेत; पण जे काही आहेत, त्यांवरून समाजरचनेची काही अंगे स्पष्ट दिसतात. वर्ण होते; क्षत्रिय व ब्राह्मण वर्ण मुख्य होते; एकमेकांचे प्रतिस्पर्धा, एकमेकांचे पूरक व आधारस्तंभ म्हणून ते राहत होते.