पान:Yugant.pdf/214

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त /१९७
 


उरला-सुरला परिवार घेऊन हस्तिनापुराला जायचे होते, स्वतःची व यादव स्त्रियांची विटंबना पहायची होती. राज्याला मुकलेल्या यादवांपैकी कृष्णाच्या नातवाला एक राज्य पांडवांनी दिले, सात्यकीच्या मुलाला एक दिले; एवढेच नव्हे, तर मार्तिकावताचे राज्य अश्वत्थाम्याला मदत करणाऱ्या कृतवर्मा हार्दिक्याच्या वंशाला दिले. सर्व यादव जिवंत राहते, तर त्यांपैकी कोणाचाच कुठल्याच राज्यावर अधिकार नव्हता. नवी राज्ये मिळाली, ती पांडवांमुळे. यादवांची व्यवस्था लावल्यावर कृष्णाच्या देण्याची अशी विलक्षण निरानंद फेड करून,मग अर्जुन व इतर पांडव मरणास तयार झाले.
 कृष्णाने एवढे प्रेम करण्यासारखे अर्जुनात होते तरी काय? अर्जुन त्या वेळच्या वीरांत अप्रतिम योद्धा म्हणून गाजलेला होता; सर्व तरुण पिढीचा, उत्तराचा, धृष्टद्युम्नाचा, सात्यकीचा, प्रद्युम्नाचा आदर्श होता. नावाप्रमाणे तो ऋजू होता. अर्जुनाच्या बाहुबलाने धर्म राजा झाला. कृष्णाने इतरांनाही राज्य मिळवून दिले. दोघेही शत्रूंना व स्त्रियांना जिंकणारे होते. कृष्णाने आयुष्यभर जे व जितके दिले, तितके अर्जुनाने देणे शक्यच नव्हते. पण अर्जुनाच्या प्रेमात त्याला सर्व मिळाले होते, व कृष्णाच्या जिवंतपणी नाही, पण मागाहून सर्व फेड अर्जुनाने केली.
 कृष्णाने असामान्य कर्तृत्वाने इतरांना राज्ये मिळवून दिली. भीष्माने तेच केले. भीष्म उपभोगशून्य राहिला. कृष्णाने श्री व संपत्ती याचा उपभोग घेतला. भीष्माने अधिकार भोगला, तर कृष्णाचा भोग अधिकारशून्य होता. एक लौकिकदृष्ट्या सर्वस्वाचा होम करून काहीतरी उपभोगीत होता, तर दुसरा सर्व भोगून खरोखरीने अलिप्तच राहिला. इतर सर्व कधीतरी रडले. भीष्म स्वतःसाठी रडला नाही. कृष्णही कधी रडला नाही. निष्कामच राहिला. इतका की, कधीकधी तो कठोरच भासतो. ह्यामुळेच महाभारतातील कृष्ण हातीच लागत नाही. अंत:करणाला भिडत नाही.