पान:Yugant.pdf/213

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६ / युगान्त


 सर्व मुले डोळ्यांदेखत मेली होती, तरी रडला नाही. द्वारकेत त्याने पाऊल घातले, ते वसुदेवाला निरोप सांगण्यापुरते. सर्व स्त्रिया आकान्त करीत होत्या. पण हा थांबला नाही. बलराम तर कुठच्याच कृत्यात पुढाकार घेत नसे. तो आधीच निघून गेला होता. कृष्णाने उरलेल्या यादवांचा भार शिरावर का घेतला नाही? व्याधाने मारले नसते, तरी तो प्रायोपवेशनाने मरणाच्याच तयारीत होता, असे का ? वृद्ध वसुदेवाला त्याने सर्वांना संभाळण्यास का सांगितले? ह्या भयंकर क्षणीही कृष्णाने विचार केला असेल का? तरुण पोरे दुसऱ्याच्या आश्रयाला गेली, तरी हरकत नव्हती. यदुवंशाची रोपटी जिवंत होती. ती वाढवणे पांडवांना शक्य व जरूरच होते. पण आपण कसे परघरी दैन्यात राहणार? ज्यांना आयुष्यभर मोठ्या शौर्याने, मोठ्या दिमाखाने सांभाळले, त्यांच्या घरी सर्वस्व नष्ट झाले अशा परिस्थितीत राहणेच शक्य नव्हते. वैभवशाली वासुदेवाला तर मुळीच नव्हते. मृत्यूखेरीज दुसरी वाटच नव्हती. कृष्णाला मरणाखेरीज मार्गच नव्हता. अंगावर आलेल्या सर्व कर्तव्यांना त्याने जसे तोंड दिले, त्याच कठोरतेने नातवांत, बायकांत मन न गुंतवता त्याने ह्याही वेळी तोंड दिले. अर्जुनावर सर्व भार सोपवला व आपण चालता झाला.
 जन्मभर लौकिक अर्थाने अर्जुनाला व पांडवांना कृष्णाच्या अगणित उपकारांची फेड करता आली नाही. त्याच्या मृत्यूनंतर ही फेड व्हावयाची होती. कृष्ण अर्जुनाशिवाय मुहूर्तभरही जगू शकत नव्हता. अर्जुनाचेही तसेच होते, असे समजायला हरकत नाही. शेवटी कृष्णाचा निरोप पोहोचल्यावर अर्जुन द्वारकेला आला तेव्हा, कृष्ण जिवंत नव्हता; पण एरवी एवढ्या तेवढ्यावरून प्रतिज्ञा करणाऱ्या व आगीत उडी घेऊन जीव देण्यास निघणाऱ्या अर्जुनाला त्या वेळी ही मोकळीक नव्हती. वसुदेवाचा शोक ऐकून त्याचा प्राण गेल्यावर इतमामाने त्याला अग्नी द्यायचा होता. कृष्णाचे शरीर शोधून त्याला अग्नी द्यायचा होता.