पान:Yugant.pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९४ / युगान्त

व ज्याच्यावर मारले तो मेला. हे पाहून जो-तो लव्हाळे उपटून एकमेकांना मारू लागला. मोठा संहार झाला. हे पाहून राम व त्याच्या मागोमाग कृष्ण ह्या दंगलीतून बाहेर पडले. कृष्णाने बभ्रूला सांगितले, "मी बाहेरच राहतो; तू बायका-मुलांना नीट संभाळून आत ने" ते करीत असता बभ्रूच मारला गेला, तेव्हा बलरामाला थांबावयास सांगून कृष्ण सर्वांना घेऊन द्वारकेत गेला व वसुदेवाकडे जाऊन म्हणाला, "तुम्ही सर्वांना संभाळा. अर्जुन येईल व सर्वांची व्यवस्था करील. मी बलरामाला थांबायला सांगितले आहे, तिकडे जातो." तो त्वरेने बाहेर पडला. दारुकाला त्याने अर्जुनाकडे पाठविले. तो रामाकडे जातो, तो रामाचे प्राणोत्क्रमण होत होते. रामाचा अंत पाहून तो झाडाखाली योगस्थ बसला, एवढ्यात एका पारध्याचा बाण लागून तोही मेला.
 दारूच्या धुंदीत एकमेकांना मारून सर्व कुल मरणे जरा कठीणच वाटते. बभ्रू, बलराम व कृष्ण हे तरी यादवांच्या हातून मेले नाहीत. म्हणजे यादवांच्या धुंदीचा व मारामारीचा फायदा घेणारा शत्रू निर्माण झाला होता, असे दिसते. त्यामुळेच द्वारकेभोवतालचा प्रदेश निर्धास्त नव्हता. तो शत्रू जुन्या क्षत्रिय घराण्यातील नसून भारतात नवीनच आलेल्या आभीरांच्या टोळ्या होत्या. त्यांनीच अर्जुनालाही जेरीस आणले.* कृष्णाच्या मृत्यूची बातमी ऐकून म्हाताऱ्या वसुदेवाने हाय खाल्ली व अंथरूण धरले. अर्जुन आल्यावर मरणोन्मुख वसुदेव


 

*ह्याच 'आभीर' लोकांनी काठेवाड, गुजरात व उत्तर महाराष्ट्रात ऐतिहासिक काळात राज्य केले, असे दाखले आहेत. ज्यांना 'अहीर' म्हणतात, खानदेशातील अहिराणी बोली ह्या आभीरांच्या वंशजांची असावी. ह्याच लोकांनी पुढे यादवांशी आपला संबंध जोडला. बहुतेक आपण क्षत्रिय आहो, हे दाखवण्याचा तो प्रयत्न असावा. यादवांबरोबर कृष्णालाही त्यांनी आपल्यातला देव बनवला असला पाहिजे. त्यामुळेच महाभारतातील राजकारणी योद्धा 'गोपाल'-कृष्ण झाला असावा. गोपालकृष्णाचा गोपीकृष्ण कोणी व कधी केला, हे मात्र महाभारतकथेवरून कळत नाही.