पान:Yugant.pdf/210

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १९३
 


 यादवांच्या विनाशाला एक पर्व खर्च पडले आहे; पण ते अगदी लहान आहे. एवढेच नव्हे तर पंधरा वीस श्लोकांच्या एका अध्यायात जे सांगितले आहे, त्याचा दुसऱ्याशी मेळ नाही. एका अध्यायात सांगितले आहे की, ऋषीच्या शापाने सांबाला मुसळ झाले. त्याचे चूर्ण करून समुद्रात फेकून दिले व राज्यात द्वाही फिरवली की, जो कोणी दारू पिईल, राजा त्याला कडक शिक्षा करील. त्याच्याच पुढच्या अध्यायात सांगितले आहे की, सर्व यादव समुद्रतीरी जत्रेला गेले व रामकृष्णांसह सर्वच यथेच्छ दारू प्याले व त्या धुंदीत एकमेकांची उणीदुणी काढू लागले.समुद्रतीरी म्हणजे कुठे ? काय द्वारका समुद्रतीरी नव्हती? द्वारकेच्या सर्व बाजूला भरभक्कम तटबंदी होती. म्हणून किनाऱ्याला लागायचे तर द्वारकेतून बाहेर पडावे लागे, असे दिसते. दारू पिऊ नये, अशी द्वाही राजाने फेिरवली असता सर्वजण दारू प्याले कसे ? का मद्यपान निषेधाचे प्रकरण जैन कथेतून महाभारतात घुसले? पहिली कुरापत शैनेय सात्यकीने हार्दिक्य कृतवर्म्याची काढली. "बिचाऱ्या द्रौपदीची निजलेली मुले अश्वत्थाम्याच्या मदतीने तू मारलीस हे कृत्य फारच वाईट"
“असे होय ! मग भूरिश्रव्याचे हात तुटले असता तू त्याचे शिर कापलेस, हे काय चांगले केलेस?’ असे हार्दिक्याने विचारले.  त्यातच सात्यकीने स्यमंतकमण्याच्या चोरीचे जुने प्रकरण उकरून काढल्यामुळे सत्यभामा रडायला लागली. सात्यकीचे व कृतवर्म्याचे युद्ध जुंपले. त्यात कृतवर्मा मारला गेला. सात्यकी इतरांनाही मारीत सुटला तेव्हा भोज व अन्धक एक होऊन त्याच्या भोवती जमले, व जेवणातील उष्टी भांडी त्याच्यावर फेकू लागले. हे पाहून प्रद्युम्न सात्यकीच्या मदतीला धावला, पण ते दोघेही त्यात मारले गेले. एका बाजूने वृष्णि-शैनेय व दुसच्या बाजूने अन्धक-भोज अशी लढत जुंपली. पाहता -पाहता सांब, प्रद्युम्न, चारुदेष्ण, अनिरुद्ध हे असे मारले गेले.हा संहार पाहून कृष्ण रागावला, व एक मूठ लव्हाळे उपटून मारणाऱ्यांना त्याने ते मारले. तो ते लव्हाळे लोखंडाचे झाले व ज्याच्यावर मारले तो मेला.