पान:Yugant.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १


एक
शेवटचा प्रयत्न

 भीष्मपर्वापासून भारतीय युद्धाची पर्वे सुरू झाली, असे समजतात. पण हे पर्व जसजसे वाचावे तसतशी खात्री पटते की, हे पर्व म्हणजे युद्धाची सुरवात नसून युद्ध थांबवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न होता. तो प्रयत्न करणारी व्यक्ती भीष्म होती. भीष्माचे सर्व आयुष्य निष्फळ त्याग करण्यात गेले. आयुष्याचे हे शेवटचे दिवस म्हणजे त्याच्या त्यागमय जीवनाची पराकाष्ठा होती. आणि आयुष्यातील इतर सर्व त्यागांप्रमाणे त्याचा हाही त्याग निष्फळ ठरला. ज्या भीष्माने स्वतःचे हक्काचे म्हणून होते त्याचा त्याग केला होता, त्याच भीष्माने वृद्धपणी-अति वृद्धपणीकौरवांच्या सेनेचे सेनापतिपद स्वीकारले तरी कसे, हाही प्रश्न मनाला टोचतो. पण भीष्माच्या सर्व आयुष्याचा विचार केला म्हणजे कळते की, भीष्माचे हे शेवटचे कृत्य सुसंगत नव्हे, तर अटळ होते.
 मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले