पान:Yugant.pdf/207

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९० / युगान्त

लागे. दुसऱ्या बाजूने तो नुसता 'अश्वहृदय'च नाही, तर 'रथीहृदय'ही असावा लागे. योद्धा आता कोणता डावपेच लढवणार आहे, कोणते बाण वापरणार आहे, कोणते अस्त्र योजणार आहे हेही त्याला कळणे आवश्यक होते. कृष्ण व अर्जुन ही दोन शरीरे व एक आत्मा होते. एकमेकांना न बोलता एकमेकांचे हृदय कळत होते. रथी व सारथी ह्यांचे हे ऐकात्म्य ह्या पर्वात फारच उत्तम दिसते. ह्याशिवाय प्रतियोद्धे... ज्यांना तोंड द्यावयाचे ते काय करीत आहेत, काय योजीत आहेत, हेही सारथ्याला निमिषमात्रात कळणे अवश्य असे. सारथी स्वतः उत्तम रथी असेल, उत्तम योद्धा व अस्त्रविद्य असेल, तरच हे सर्व शक्य होते आणि कृष्ण हे सर्व होता. शिवाय अर्जुनाला प्रेमाने बांधला गेला होता.
 अर्जुनाला लांब गुंतवून धर्माला पकडणे हे साध्य ह्या दिवसापुरते तरी दूर ठेवणे कौरवांना प्राप्त होते. जयद्रथाला सर्वांत पाठीमागे ठेवून अर्जुनाला तेथपर्यंत पोहोचणे अशक्य करणे एवढाच ह्या दिवसाचा दुर्योधनादींचा प्रयत्न होता. एकेका योद्धयाच्या हाताखाली एकेक सैन्यविभाग होता. प्रत्येक आपल्या सैन्यानिशी अर्जुनावर तुटून पडत होता. पहिली सलामी खुद्द द्रोणाशीच झाली. द्रोणाच्या सैन्याला पळवून लावल्यावर वाट सापडताच कृष्णाने रथ पुढे काढला. द्रोणाने अर्जुनाला आव्हान केले, 'असा निसटून काय जातोस? ये ना माझ्याशी दोन हात करायला' तेव्हा 'नमस्कार गुरुजी, आज नाही', म्हणून अर्जुन पुढे सरकला. दु:शासन आडवा आला, त्याला घायाळ करून रथ पुढे निघाला. भोजाच्या सैन्याची अशीच दाणादाण झाली. पक्ष्यांच्या भरारीने जाणारे घोडे छिद्र सापडेल तेथून वाट काढीत होते. अर्धा दिवस कंदन झाले. घोडे थकले होते. अर्जुन म्हणाला, "मी शत्रूला संभाळतो, तू घोड्यांची चाकरी कर" त्याने रथातून उडी टाकली व तो रथापुढे जमिनीवर उभा राहून युद्ध करू लागला. मागच्या बाजूने कृष्णाने घोडे सोडले, त्यांच्या पाठीवर रुतलेले शर काढले, त्यांना पाणी पाजले जमिनीवर