पान:Yugant.pdf/206

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/१८९
 

नव्हतेच का? कारुण्य, व्याकुळता ह्यांना वाव नव्हताच का?' असे वाटून मन घाबरे होते. "द्रौपदीला, सुभद्रेला व उत्तरेला चार गोष्टी सांग," असे म्हणून त्याने दुःखाने वेड्या झालेल्या त्या बायांना निरोप दिला व तो अर्जुनाच्या शिबिरात शिरला. त्याने हातपाय धुऊन, नवे दर्भ पसरून अर्जुनाची तृणशय्या केली. भोवती आयुधे ठेवली. अर्जुनाचे उपचार केले. ह्या कृत्यांनी अर्जुन ताळ्यावर आला. त्यानेही हातपाय धुवून कृष्णाचा सत्कार केला. कृष्णाने 'स्वस्थ नीज', असे म्हणून त्याचा निरोप घेतला. त्याच्या शिबिराभोवती रक्षणासाठी उत्तम योद्धे ठेवले व तो स्वतःच्या शिबिरात जाऊन उद्याची जबाबदारी कशी पार पाडावी, ह्याची चिंता करीत बसला. त्याने दारुकाला बोलावले व स्वत:चा रथ जोडून उत्तम शस्त्रांनी भरून ठेवावयास सांगितला. "अर्जुन नाही, तर मी जयद्रथाला मारीन. सर्व कौरवांना मारीन. मुलंबाळं, नातेवाईक कोणीही मला अर्जुनापेक्षा आवडते नाहीत. अर्जुनापाठीमागे मुहूर्तमात्रसुद्धा मी जगणे शक्य नाही. त्याचे शत्रू ते माझे शत्रू, त्याचे मित्र ते माझे मित्र. तो माझा शरीरार्ध आहे. हे उद्या सर्वांना समजेल. रथ तयार ठेव, कवच घालून तयार रहा. मी पांचजन्य वाजवला की असशील तसा रथ घेऊन ये." अशी त्याने दारुकाला आज्ञा केली. महाभारतातील कृष्णाने दुसऱ्या कोणाहीबद्दल हा जिव्हाळा, ही तळमळ दाखवलेली नाही. अर्जुनाला रात्री साक्षात श्रीशंकराचे दर्शन झाले वगैरे भाग सोडला, तर पुढचा भाग युद्धातील डावपेच व कृष्णार्जुनांचे विलक्षण युद्धकौशल्य ह्या दृष्टीने अतिशय वाचनीय आहे. 'लढाईत मोठा कोण, सारथी की रथी?' हा प्रश्न पडतो. सारथ्याचे कौशल्य अजबच होते. सारथ्य जाणणाऱ्याला नलोपाख्यानात 'अश्वहृदय' शब्द आहे. तो घोड्यांचे अंतरंग जाणणारा असावा लागे. आपले घोडे काय करू शकतील, हे त्याला कळत असे. त्यांना दाबावे केव्हा, दौडवावे केव्हा, हे त्याला समजत असे. ते दमलेले, भ्यालेले असले, तर त्याला ताबडतोब उमगावे