पान:Yugant.pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८८ / युगान्त

अर्जुनाने रागाच्या व दुःखाच्या भरात प्रतिज्ञा केली, "उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन" सर्वच दृष्टीने ही प्रतिज्ञा विलक्षण होती. जयद्रथ व्यूहाच्या तोंडाशी होता; पांडवसैन्य अडवण्याचे त्याचे कामच होते. तो ज्या स्थानावर नेमला होता, त्या स्थानामुळे ही जबाबदारी त्याच्यावर पडली होती. अभिमन्यूशी लढून त्याला मारणारे निराळेच होते; त्यांना बाजूला सारून जयद्रथवधाची प्रतिज्ञा त्याने रागाच्या भरात केली ! जयद्रथ ही महाभारत-युद्धातली एक क्षुद्र व्यक्ती होती. धर्मराज त्याला 'क्षुद्र'च म्हणतो. अर्जुनाच्या प्रतिज्ञेने सगळेच मोठ्या चिंतेत पडले. कृष्णाने आश्चर्याने विचारले, "अरे, अशी काय प्रतिज्ञा करून बसलास? मला विचारले नाहीस, भावांना विचारले नाहीस, आणि रागाच्या भरात बोलून गेलास? आता कसे हे साहस पार पाडणार?" अर्जुनाचे उत्तरही अनपेक्षितच वाटते. अर्जुन आपल्या धुंदीतच होता. तो म्हणतो, "कृष्णा, मला काय हे अवघड का आहे? अरे, मी अमक्याला जिंकले, तमक्याला जिंकले. देव आले, तरी त्यांना जिंकीन. माझे धनुष्य, माझे बाहु व मला माहीत असलेली अस्त्रे ह्यांना कमी लेखू नकोस. बघशील उद्या. अगदी पहाटे रथ तयार ठेव मात्र ".
 कृष्णाने उत्तर दिले नाही. तो त्याच्या शिबिरात गेला. तेथे सुभद्रा रडत बसली होती. थोड्याच वेळाने द्रौपदी व उत्तराही आल्या. कृष्णाने त्यांचे सांत्वन केले, म्हणण्यापेक्षा शक्य तितक्या थोड्या वेळात, थोड्याशा कठोरपणानेच त्यांना वाटेला लावले. "सुभद्रे, अशी रडू नकोस. तुझा मुलगा वीरमरणाने मेला. आम्ही सर्वच त्या दिशेने चाललो आहोत. क्षत्रिय युद्धात मरायचे नाहीत तर कुठे मरायचे? त्याला स्वर्गप्राप्ती झाली आहे." हे काय सांत्वन? पुढे तो काय म्हणतो, "आता जा, उद्या तुला आनंदाची बातमी कळेल." आनंदाची बातमी कसली? तर तुझ्या शत्रूचे... जयद्रथाचे मरण ! ही काय आनंदाची बातमी? ह्या अशा प्रसंगांनी सबंध महाभारताची कठोर, कर्तव्यदक्ष भूमिका विशद होते. "मानवी भावनांना स्थान