पान:Yugant.pdf/202

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / १८५
 

त्रिदंडी संन्यास घ्यायला लावायचा, आणि यती म्हणून त्याला अंतःपुरात आणून बसवायचा; बलरामदादाला फसवायचे, वगैरे ज्याप्रमाणे कृष्णाने केले नाही, त्याचप्रमाणे पुढे काय होणार हे कळून सर्वांना वाचवण्याची शक्यता असताही पृथ्वीला भार झाला आहे, म्हणून सर्व योद्ध्यांना अश्वत्थाम्याच्या हातून मारवले, हेही कृष्णाने केले नाही.
 अभिमन्यूचा मुलगा परीक्षित म्हणजे सुभद्रेचा, कृष्णाच्या बहिणीचा नातू पुढे हस्तिनापूरच्या राज्यावर बसला. ह्यातही कृष्णाचे काही कर्तृत्व वा कारस्थान नव्हते. अज्ञातवासाच्या शेवटापर्यंत पांडवांच्या कुठल्याच मुलाचे लग्न झालेले नव्हते. निदान महाभारतात तसा उल्लेख नाही. सत्यभामेस घेऊन कृष्ण वनवास सरता-सरता पांडवांना भेटण्यास आला होता. मुलांची खुशाली व अस्त्रविद्येतील त्यांची प्रगती ह्याबद्दल त्याने द्रौपदीस सांगितले. मुलांची लग्ने झाली असती, तर तसा उल्लेख ह्या वेळी यावयास पाहिजे होता. अर्जुन बृहन्नडारूपाने मुलीला नृत्य शिकवीत होता, हे कळल्यानंतर, 'तूच उत्तरेशी लग्न कर, म्हणजे योग्य होईल.' असे विराटाने सांगितले. चार दिवस अंबा हस्तिनापुरात राहिली, तर शाल्व तिच्याशी लग्न करीना, तर वर्षभर अर्जुनाबरोबर नृत्य शिकणाऱ्या उत्तरेला दुसरा नवरा मिळणे जडच गेले असते. 'मी तिच्याकडे पितृभावनेने पाहतो. माझ्या मुलाशी तिचे लग्न होऊ दे', हे अर्जुनाचे उत्तर मिळाल्यावर द्वारकेहून अभिमन्यूला बोलावले; अर्जुनाला द्रौपदीच्या पोटी झालेला मुलगा होता, त्याला का नाही बोलावले ? उत्तर सरळ आहे. द्रौपदीला पाच मुले होती. त्यांपैकी धर्माचा मुलगा वडील होता. द्रौपदीने द्युताच्या वेळी त्याचा उल्लेख 'युवराज' म्हणून केला होता. द्रौपदीच्या मुलांची लग्ने एक तर एकामागून एक ओळीने झाली असती, किंवा सर्वांची एकदम झाली असती. त्यातल्या मधल्याचे सर्वांआधी होणे शक्यच नव्हते. अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा, पण पांडवांच्या पट्टराणीचा नसल्यामुळे