पान:Yugant.pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८४ / युगान्त

जाण्याचा धीर झाला नाही. परत कृष्णालाच दुर्योधन मेल्याचा निरोप घेऊन त्यांच्याकडे जावे लागले. गांधारी व धृतराष्ट्र यांच्याशी बोलत असतानाच दूत येऊन दुर्योधनाच्या व अश्वत्थाम्याच्या शेवटच्या संभाषणाची बातमी सांगत असताना काहीतरी दगाफटका आहे, हे हेरून, आपले भाषण अर्धवट टाकून, घाईघाईने निरोप घेऊन कृष्ण पांडवांच्या शिबिराकडे परत आला. पांडव आणि द्रौपदी यांना घेऊन तो कौरवांच्या ओसाड शिबिरात येऊन राहिला. कृष्णार्जुन जातील, तिथे सात्यकी असायचाच, या न्यायाने सात्यकीही बरोबर होता. रात्रीच्या छाप्यात व निर्घृण कत्तलीत द्रौपदीची मुले व भावंडे मारली गेली पण पांडव वाचले.
 ह्याही घटनेत कृष्णाला दोष देण्यासारखे काहीही नाही. जासुदाच्या बोलण्यावरून काहीतरी घातपात होणार, असे कृष्णाला वाटले. पण तो घातपात नक्की काय होणार, हे काही त्याला कळले नव्हते. मुख्य युद्ध दुर्योधन-पांडवांचे होते. सूडाचे उद्देश्य पांडवच असणार, असे त्याला वाटले असले पाहिजे. लढाई जिंकल्याच्या उन्मादात लढाईच्या वेळची शिस्त व जागरूकपणा पार नाहीसा झाला होता. जे ते नाच-रंगात व दारू पिण्यात दंग होते. प्रत्यक्ष सेनापती धृष्टद्युम्नाची व इतर मोठमोठ्या लोकांची परिस्थिती ही होती. सैन्याची काय होती, हे सांगायलाच नको. कृष्ण हस्तिनापुराहून परत आला, तो रात्र पडली होती. अशा वेळी ह्या अस्ताव्यस्त शिबिराला परत सुस्थित करणे हे दुष्कर काम होते. त्यातूनही ज्यांच्यासाठी सबंध लढाई व वैर उत्पन्न झाले होते, त्या पांडवांनाच बाजूला काढले म्हणजे झाले, असे कृष्णाला वाटले असले पाहिजे. कृष्णाला देवत्वाच्या कोटीला पोहोचवून त्याला सर्व किंवा त्रिकालज्ञ करायचे आणि मग त्याने न केलेल्या गोष्टींचेही कर्तृत्व त्याच्याकडे चिकटवायचे, किंवा त्याच्या हातून काही गोष्टी घडल्या नाहीत, म्हणून त्याला दोष द्यायचा, हे दोन्ही चुकीचे आहे. अर्जुनाने सुभद्रेशी लग्न करावे, म्हणून त्याला वनवास घडवायचा;