पान:Yugant.pdf/200

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १८३
 

 एक आगळीक झाली की, त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी आगळीक करणे प्राप्तच होते. एकदा लढाईला उभे राहिले, म्हणजे ती शेवटपर्यंत नेणे हे कर्तव्यच होते. भीष्माला मार, किंवा द्रोणाला मार, असे त्याने सांगितले नव्हतेच. भीष्माला घायाळ करून लढाईतून बाजूला सारणे एवढाच त्याचा उद्देश होता. त्याचप्रमाणे भीमाने व धृष्टद्युम्नाने द्रोणाचा रथ पकडल्यावर तो तसाच हाकून गुरुजींना पकडून आणले असते, तरी कृष्णाला पुरले असते. द्रोणाला मारून धृष्टद्युम्नाने वडिलार्जित वैराचा सूड उगवला, हा काही कृष्णाचा अपराध नाही. अश्वत्थामा मेला, ही खोटी हूल उठवायची हाही प्रकार अपरिचित नव्हता. अगदी ह्याच उपायाने हंस व डिम्भक हे जरासंधाचे दोन सेनानी मारले गेले होते. कृष्णाने शिष्टाईच्या वेळेला युद्ध टळावे, म्हणून जशी पराकाष्ठा केली, तसाच युद्धाला एकदा उभे राहिल्यावर ते जिंकावे, म्हणून जिवाचा आटापिटा केला. हीच गोष्ट कर्णाच्याही बाबतीत लागू पडते. जे लढाईला उभे राहिले होते, त्या सर्वांनी आगळीक केलेलीच होती, त्यांतील कोणीही निर्व्याज किंवा निरपराधी नव्हता. त्यांना कृष्णाने मारवले, ते काही गाफील अवस्थेत नाही. एवढे म्हणता येईल की, एकदा युद्धात उभे राहिल्यावर कृष्णाने कोणत्याही तऱ्हेची दयामाया दाखवली नाही. आपल्याला कोणी दयामाया दाखवील, अशी त्याची आशा नव्हती. सर्व लोक मारले गेले, केवळ दुर्योधन उरलेला होता. प्राणभयाने तो लपून राहिलेला होता. तो प्रत्यक्ष दयेची याचना करणारा नव्हता. पण बापाकडून दडपण आणून प्राण वाचवावा, असा त्याचा प्रयत्न असावा, असे वाटते. अगदी निष्ठुरपणे कृष्णाने तोही प्रयत्न हाणून पाडला. दुर्योधन जिवंत राहता, तर त्याने पांडवांना सुखाने राज्य करू दिले नसते, अशी कृष्णाची मनोमन खात्री होती.