पान:Yugant.pdf/199

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२/ युगान्त

 ही सर्व वचने पाहिली म्हणजे भावा-भावांतील युद्ध थांबवण्याचा कृष्णाने किती निकराने प्रयत्न केला हे दिसते. कर्ण कोणत्याही मोठेपणाला बळी पडणार नाही हे माहीत होते, म्हणून कृष्णाने अशी भरमसाट प्रलोभने दाखवली, हे म्हणणे योग्य वाटत नाही. पांडव-कृष्णाचे एवढे ऋणी होते की, मी सांगेन ते ते ऐकतील, अशी कृष्णाची खात्री होती, म्हणून त्याने ही विलक्षण प्रलोभने कर्णाला दाखवली. ही दाखवीत असता राज्य मिळेल, ह्या आशेवर बसलेल्या धर्माचा त्याने गळा कापला, किंवा बिचाऱ्या द्रौपदीचा सौदा केला, असे दोन्ही आक्षेप त्याच्यावर येतील पण त्याने शिष्टाई दांभिकपणे केली, हा आरोप खासच येणार नाही. परत एकदा कृष्णाची मूल्ये ही त्या काळाची मूल्ये होती, हे निदर्शनाला येते. धर्म मोठा भाऊ म्हणून राज्याचा वारस होता. एखादा मनुष्य धर्मापेक्षा वडील, त्याच्या आईचा मुलगा म्हणून राज्याचा वाटेकरी असा पुढे आला असता व इतर भावांनी त्याला मान्यता दिली असती, तर त्याला राज्य मिळण्याचा चांगलाच संभव होता. राज्याचा वाटा कुंतीच्या मुलांना मिळावा व युद्ध टाळावे, अशा दोन गोष्टी कृष्ण साधू पाहत होता. आपण मित्राचा विश्वासघात करतो आहे असे त्याला वाटले नाही. द्रौपदीचे अर्जुनावर प्रेम असूनही तिला सर्व पाच जणांची बायको व्हायला लागले होते. त्यात एकाची भर पडली म्हणून काही वावगे झाले, असे त्याला वाटले नाही. बायकांना मन असते, ही गोष्ट त्या वेळचे कोणतेच पुरुष- भीष्म, वसुदेव, पांडव, कृष्ण-कोणीच मानीत नसत. जे इतर क्षत्रिय करीत असत, तेच ह्या बाबतीत कृष्णानेही केले. द्रौपदीला चीड आली असती किंवा नसती, हा विचार त्याच्या मते गौण होता.
 भीष्माचा पराभव व द्रोणाचा वध ह्या दोन्ही वेळी त्याचे कृत्य असेच सर्वस्वी समर्थनीय होते. आजोबांना मारू नये, गुरुंना मारू नये हे जितके खरे, तितकेच आजोबाने किंवा गुरूने नातवाविरुद्ध व शिष्याविरुद्ध लढाईला उभे राहू नये, हेही खरे !