पान:Yugant.pdf/198

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त/१८१
 

'अर्धे राज्य नाही. पाच गावे नाहीत, एवढेच नव्हे, तर सुईच्या अग्राखाली मावेल एवढीदेखील जमीन मी देणार नाही,' या दुर्योधनाच्या उत्तरामुळे लढाईखेरीज उपाय उरला नाही. कौरवांच्या दरबारातून कृष्ण निसटला. त्याने जाता-जाता वाटेत कर्णाला आपल्या रथावर घेतले व पांडवांच्या बाजूने कर्णाला फितवण्याचा प्रयत्न केला. कृष्णाला पकडले की पांडवांना लढणे अशक्य होईल, असा ज्याप्रमाणे दुर्योधनाचा कयास, तसाच कर्ण बाजूला निघाला, तर दुर्योधनाला पांडवांचे मागणे झिडकारता येणार नाही, हा कृष्णाचा कयास. सबंध उद्योगपर्वभर शह, काटशह असे प्रकार चालले होते. दुर्योधनाचा प्रयत्न आडदांडपणाचा होता. कृष्ण त्यातून निसटला व दुर्योधनाचा प्रयत्न फसला. कृष्णाचा प्रयत्न अगदी याउलट, मोठ्या चतुराईचा; पण कर्णाच्या दुर्योधनभक्तीपुढे व दुखावल्या स्वाभिमानापुढे तोही फसला. कृष्णाने कर्णाला सांगितले, बाबा, तू कुंतीचा कुवारपणाचा मुलगा. शास्त्रार्थाने त्या कुवारणीचे ज्याच्याशी लग्न झाले, त्याचाच तू होतोस. म्हणजे बापाकडून तू पांडव व आईकडून वृष्णिकुलातला आहेस. माझ्याबरोबर ये, पांडवांना तू कुंतीचा मुलगा, युधिष्ठिराचा थोरला भाऊ, हे कळू दे. मी तुला राजा म्हणून अभिषेक करवतो. पांडवांतला सहावा म्हणून द्रौपदी तुझी होईल. (षष्ठे च त्वां तथा काले द्रौपद्युपगमिष्यति।) धर्म तुझा युवराज होईल, भीम तुझ्यावर चवरी धरील, अर्जुन तुझे सारथ्य करील. वृष्णी व पांचाल तुझे सेवक होतील. 'वसुषेण' म्हणून तुझ्या नावाची द्वाही फिरेल' कृष्णाने ह्या ठिकाणी कर्णाच्या पाळण्यात ठेवलेल्या 'वसुषेण' नावाचा उच्चार केला. सेन हा प्रत्यय क्षत्रियांच्या नावापुढे असे. त्या नावावरून त्याचे क्षत्रियत्व प्रतीत होते. कर्ण वैकर्तन (कानफाट्या) हे टोपणनाव उच्चारलेच नाही, हाही कृष्णाचा शहाणपणाच.
 ही लालूच तर फारच मोठी होती, पण कर्ण बधला नाही. राज्य, मोठेपणा व त्यामुळे द्रौपदी आणि बलाढ्य क्षत्रिय-घराण्यांशी