पान:Yugant.pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७६ / युगान्त

आपल्यावर कडी केली म्हणून चिडलेला होता. त्याच्या आरोपामध्य काही खरे, काही खोटे असे होते. भीष्माबद्दल व कृष्णाबद्दल काही थोड्या लोकांना काय वाटत असे, हे त्याच्या तोंडून वदवले गेले आहे. कृष्णाच्या कृत्यांची छाननी केल्यास जी कृत्ये शिशुपालाने दोषास्पद ठरवली होती, ती तशी होती, असे म्हणता येत नाही. शिशुपालाचा वध हे मात्र काहीसे दोषास्पद वाटते. तो वधाला योग्यच होता. पण आवेशाने बोलत असताना भर सभेत कृष्णाने त्याच्यावर चक्र फेकून मारावे, हे कृत्य खटकल्याखेरीज राहत नाही. तसे करण्यावाचून गत्यंतर नव्हते, एवढे मात्र खरे ! सर्व राजसूय यज्ञ पार पडलेला होता. आलेल्या राजेलोकांचा सन्मान करून त्यांना परत पाठवणे एवढेच कृत्य उरले होते. पांडवानी भीष्माला पुढे करून कृष्णाला पहिले अर्घ्य देण्याचा घाट घातला. शिशुपाल उठून त्याने अर्घ्याला हरकत घेण्याचा अतिप्रसंग केला. बोलण्याने बोलणे वाढत चालले होते. राजे-लोकांच्यामध्ये चुळबूळ सुरू झाली होती. शिशुपाल युद्धाच्या गोष्टी बोलू लागला होता. अशा वेळी मंडपाबाहेर जाऊन युद्धाला सुरवात झाली असती तर मोठेच विघ्न झाले असते. एकटा शिशुपाल तडकाफडकी मारला गेल्यामुळे कोणाला काही करता येईना. हा प्रसंग झाल्यावर आश्चर्याने व भीतीने सर्व सभा स्तब्ध झाली. काही राजे चुळबुळत, हात चोळीत स्वस्थ बसले होते, असे महाभारतात वर्णन आहे. कृष्णाने शिशुपालाला असे मारले नसते, तर राजसूय यज्ञाचा शेवट मोठा वाईट झाला असता. शिशुपालाला मंडपातून रागारागाने बाहेर जाऊ देणे हे योग्य नव्हते.
 ह्या प्रसंगात ज्या एक दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात, त्या इतर वेळीही येतात.

  1. मनुष्य जन्मला, म्हणजे त्याचे स्वतःचे वर्तन व सामाजिक संबंध त्याला एका कोंडीत पकडतात. त्याचा स्वतःचा ताबा नाही, अशा प्रसंगात तो सापडतो व त्याच्या हातून काही