पान:Yugant.pdf/190

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / १७३
 

तो मित्रांच्या बाजूने उभा राहिला. ह्या सर्व प्रकरणात कृष्णाच्या मैत्रीचा दृढपणा दिसून येतो. त्याच्या मित्रांनी काही इतरांच्या अन्यायाने, काही स्वतःच्या गुणांनी सर्वस्व गमावले होते. त्या अन्यायाचा प्रतिकार करायला कृष्ण सिद्ध होता. दूरवरचे परिणाम सर्व काही त्याला दिसले असतील, असे म्हणवत नाही. पण काही थोडे परिणाम तरी डोळ्यांपुढे दिसतच होते. वर म्हटल्याप्रमाणे त्याने मोठ्या प्रयत्नाने दूरदर्शीपणाने जमविलेली व्यवस्था ह्या त्याच्या उतावळ्या, शूर; पण नाकापलीकडे न दिसणाऱ्या मित्रांनी गमावली. त्यांच्याबद्दल कृष्णाने रागाचे शब्द काढले; पण गेलेले मिळवून देण्यासाठी त्याने मदतच केली.
 अर्जुनाला लढाईला उभे राहण्याचा उपदेश करताना कृष्णाची वाक्ये वरील संदर्भात वाचली म्हणजे त्याला एक निराळाच अर्थ प्राप्त होतो. कृष्णाच्या जीवनमूल्यांवर, जीवनविषयक दृष्टिकोणावर एक निराळाच प्रकाश पडतो, पांडवांना राज्य मिळाल्याबरोबर कृष्णाचे हेतू साध्य झाले होते. त्याचप्रमाणे पांडवांच्या राज्य गमावण्याबरोबर ते धुळीला मिळाले होते. तो विचार करून उघड्या डोळ्यांनी कर्म करीत होता. त्याचे स्वतःचे असे काही साध्य व्हायचे नव्हते. त्याच्या संपत्तीत, त्याच्या कीर्तीत नवी भर पडायची नव्हती. काही बाबतीत सर्वस्वहानी झाली होती, तरी कर्तव्य म्हणून तो लढाईला उभा राहिला. अर्जुनाला त्यातून काहीतरी मिळणार होते, पण कृष्णाला तरी काहीच मिळणार नव्हते. 'हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्'. कृष्ण त्या लढाईत मरायचा तर नव्हताच, किंवा लढाई जिंकून राजाही व्हायचा नव्हता. त्याचा सर्वस्वी हेतुनिरपेक्ष, स्वार्थनिरपेक्ष लढा होता. तो मित्रकार्य करीत होता. त्याच्या दृष्टीने मित्रांची बाजू न्यायाची होती. दुर्बलही होती. प्रत्यक्ष पांडव व पांचाल शूर होते. स्वतःचे गमावलेले मिळवण्याच्या हिरिरीने ते लढत होते. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, तरी कौरवांचे सैन्य पांडवांच्यापेक्षा कितीतरी मोठे,