झाले त्याला इलाज नाही, असे म्हणून कृष्णाला स्वस्थ बसता आले असते. कौरवही त्याचे मित्रच होते. द्यूताचे आमंत्रण क्षत्रियाला नाकारता येत नाही, असा धर्मराजाचा दावा होता. तो जरी खरा मानून चालले तरी बायकोसुद्धा सर्वस्व पणाला लावणे हे निश्चित योग्य नव्हते. चाललेल्या द्यूतात चुकून एकदासुद्धा फासे आपल्या बाजूला पडत नाही हे दिसूनही, हे द्यूत खरेपणाने खेळले जात नाही हे धर्माला न उमजावे, हेही आश्चर्यच. एक प्रकारच्या धुंदीत धर्मराज द्यूत खेळत होता, असे वाटते. अशा या नादान मित्रांना कृष्णाने सोडले असते, ‘नशीब तुमचे,' असे म्हणून तो गप्प बसला असता, तरी त्याचा राजकीय, सामाजिक कौटुंबिक डाव स्थिर झाला असता. 'आम्ही यादवांनी नाही का आमच्या जन्मभूमीवरून पळून जाऊन दुसरीकडे राज्य स्थापले? तुम्हीही लांब जाऊन तसेच करा; या कौरवांचा शेजारच नको; मी तुम्हांला मदत करतो,' असेही त्याला म्हणता आले असते. पांडव वनवासात गेल्यानंतर कृष्ण त्यांना भेटायला आला, तेव्हा झाल्या गोष्टींबद्दलची त्याची तीव्र निराशा व हळहळ व्यक्त झाली आहे.
"मी असतो, तर हे द्यूत मी कदापि खेळू दिले नसते," हे शब्द त्याने परत-परत उच्चारले, पण ह्या कठीण प्रसंगी त्याला मैत्रीचा विसर पडला नाही. तो पांडवांच्या बाजूने ठाम उभा राहिला. वनवास व अज्ञातवास चुकवता येणे शक्य नव्हते; पण पांडवांच्या मुलाबाळांची व्यवस्था त्याने पांचालांच्या मदतीने पार पाडली. पांडव वनवासातून आल्यावर लढाई न होता काहीतरी तडजोड करण्यासाठी त्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली, दुर्योधनाच्या सभेत शिष्टाईचा प्रयत्न फसल्यावर द्रौपदीची लालूच दाखवून कर्णाला फोडण्याचा त्याने प्रयत्न केला. शिष्टाईच्या वेळेला आपल्या मित्रांच्या वतीने अर्धे राज्य न मागता ‘काही थोडे तरी दे', असे म्हणण्याची लाचारी त्याने पत्करली. पण त्याचे सर्व प्रयत्न फुकट गेले, “तुम्ही आपापसांत भांडा; मी आपला बाजूला राहतो', असे बलरामाप्रमाणे त्याला म्हणता आले असते.
पान:Yugant.pdf/189
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२ / युगान्त
