पान:Yugant.pdf/188

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १७१
 


 सार्वजनिक दृष्टीने या मान्यतेला अग्रपूजेच्या वेळी शिक्कामोर्तब झाले. राजा नसूनही, वयाने सर्वांत वडील नसूनही, क्षत्रियांच्या सभेत कृष्णाला हा मान मिळाला होता. इतके करूनही अजून एक राजा स्वतःला वासुदेव म्हणवून घेणारा राहिला होता. पण त्याला मारणे कृष्णाला कठीण नव्हते. म्हणजे वासुदेवत्व सर्वस्वी प्राप्त झाले नसले, तरी हातात आल्यासारखे होते. कृष्णाचे सर्व हेतू साध्य होऊन तो कृतकृत्य झालेला होता. नंतरच्या कथाभागावरून आपल्याला समजते की, इंद्रप्रस्थाहून निघाल्यावर कृष्ण लगेच आपल्या काही उरलेल्या शत्रूंंचा समाचार घेण्यात गुंतला.
 सर्व आयुष्यभर जे मिळवायची धडपड केली, जे स्वप्न उराशी बाळगले, ते प्रत्यक्षात उतरले होते. पण ही सफलता क्षणजीवी ठरली. मोठ्या प्रयासाने बांधलेली ही इमारत अनपेक्षितपणे व धर्माच्या नादानपणामुळे एका क्षणात गडगडली. कृष्णाची साध्ये ही विशाल असली, तरी पांडवांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी निगडित चालली होती. पांडव सुप्रतिष्ठित असणे हे कृष्णाच्या साध्यांना आवश्यक होते. पांडव इंद्रप्रस्थात राहून त्यांची आणि धार्तराष्ट्रांची कुरबूर झाली असती, तरी कृष्णाच्या हेतूला तडा गेला नसता. पण धर्मराजाच्या कृत्यामळे सगळ्याच हेतूंचा एक प्रकारे नाश झाला. कृष्णाचे वासुदेवत्व राहिले. वैयक्तिक मोठेपणा राहिला, पण बाकी सर्व गेले.
 धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळेला सर्व क्षत्रिय घराण्यांचा म्हणून जो एक तोल साधलेला होता, तो इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांच्या हातून गेल्यामुळे कोलमडून पडला. ह्या प्रसंगी कृष्णाच्या मित्रप्रेमाची कसोटी लागली. पांडवांनी आपले राज्य नादानपणाने घालविले, ह्याचा अर्थ एवढाच झाला की, अर्धे तोडून दिलेले राज्य हस्तिनापूरच्या शाखेला परत मिळाले. पांडवांनी आपल्या हातांनी नाश करून घेतला.