पान:Yugant.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७० / युगान्त

मिळविणारी अशी व्यक्ती दर कालखंडात होऊन जाई असे दिसते. वासुदेव-पदवीला योग्य कोण, कशामुळे वासुदेव-पदवी मिळविता येई, ह्या गोष्टी जैन वाङ्मयात काय, किंवा महाभारतात काय, कोठेही स्पष्ट केलेल्या नाहीत. ती पदवी मिळवण्याची श्रीकृष्णाने अतिशय खटपट केली व कृष्णाच्या आयुष्यात त्याची स्वतःबद्दल अशी जी आकांक्षा होती, ती ‘वासुदेव' होण्याची होती यात शंकाच नाही. म्हणजे ‘न में पार्थास्ति कर्तव्यम्' असे म्हणणाऱ्या कृष्णाला, स्वतःबद्दल, कुलाबद्दल व समाजाबद्दल काही आकांक्षा व ध्येय होते व ती पार पाडण्यासाठी त्याने धडपड केली, हे स्पष्ट होते.
 भीमाने जरासंधाचा वध केला. धर्माच्या राजसूय-यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा पहिला मान मिळाला. त्याच निमित्ताने शिशुपालाचाही वध झाला. ह्या सर्व प्रकारानंतर पांडवांचा पाहुणचार घेऊन, सर्वांचा निरोप घेऊन कृष्ण द्वारकेला परत गेला. जिवाच्या भयाने लपत-छपत रानोमाळ हिंडणारे पांडव इंद्रप्रस्थात दिग्विजयी सम्राट म्हणून मिरवले. पांडवांच्या आयुष्यातला हा विजयाचा क्षण कृष्णाच्याही आयुष्यातील परमोच्च बिंदू होता. सामाजिक, कौटुंंबिक व वैयक्तिक अशा सर्व महत्त्वाकांक्षा ह्या क्षणी कृष्णाच्याही बाबतीत पुऱ्या झाल्या होत्या. यादव द्वारकेमध्ये स्थिर झाले होते. इंद्रप्रस्थाला पांडव व हस्तिनापुराला कौरव ही दोन्ही घराणी यादवांच्या नात्यातील व स्नेहातील होती. शिशुपालाच्या गादीवर शिशुपालाचा मुलगा बसला होता. तो कृष्णाला अनुकूल होता. जरासंधाच्या मुलाला अभय देऊन जरासंधाच्या राज्यावर बसवले होते. एकमेकांशी तुल्यबळ असलेले राजे एकमेकांशेजारी नांदत होते. म्हणजे क्षत्रिय समाजाची घडी पूर्ववत झाली होती. एवढेच नव्हे, तर यादवांच्या दृष्टीने त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीतसे होऊन मित्रराज्ये त्यांच्या शेजारी स्थापन झालेली होती. हे सर्व होत असताना कृष्णाच्या शौर्याची व शहाणपणाची छाप सर्वांवर बसली होती. काही थोडे असंतुष्ट लोक वगळल्यास कृष्णाचे वैयक्तिक महत्त्व