पान:Yugant.pdf/186

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त/१६९
 

 त्याप्रमाणे खरे पाहिले, तर वसुदेवाच्या सर्वच मुलांना वासुदेव ही संज्ञा असावयास पाहिजे होती. पण ती फक्त कृष्णालाच तेवढी दिसते. म्हणजे वासुदेव हे पैतृक नाव नसून काही विशेष अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तीनेच फक्त घ्यावयाचे ते पद होते. ज्याप्रमाणे राजसूय यज्ञ केलेल्या माणसाला सम्राट पदवी प्राप्त होई, व एकाच वेळी राजसूय यज्ञ केलेले दोन राजे असू शकत नव्हते, तसेच काहीतरी वासुदेव ह्या पदवीत असावे. वासुदेव म्हणवून घेण्याची धडपड काही राजे करीत. पण खरोखर ती पदवी एकच धारण करू शकत असे.
 कृष्णाच्या वर्णनामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस येते. डोळे दिपतील अशा तऱ्हेचे दैवी तेज व असामान्य वैभव त्याच्याजवळ होते. त्याचा रथ, त्याचे घोडे, तो स्वतः कोठेही असला, तरी लोकांचे डोळे दिपत असत. तो रत्ने व संपत्ती ह्यांचा स्वामी होता. 'वासुदेव' ह्या शब्दातही तो अर्थ प्रतीत आहे. ‘वस' म्हणजे संपत्ती, समृद्धी असा अर्थ होतो. 'देव' हा शब्द तेजस्वीपणा व अतिमानुषता दाखवतो. कृष्णाने लोकांचे डोळे दिपवून टाकायचे प्रसंग महाभारतात ठिकठिकाणी आलेले आहेत. सर्व ऋद्धिसिद्धी ज्या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत, ती व्यक्ती म्हणजे वासुदेव, अशी कल्पना मनात येते. आपण अशी व्यक्ती आहोत, असा कृष्णाचा आग्रह होता; व तसे असल्याबद्दल आपल्याला सर्वांनी मान्यता द्यावी, असा त्याचा अट्टाहास होता असे वाटते.
 बौद्ध वाङ्मयामध्ये कृष्ण वासुदेव (कण्ह वासुदेव) हा देवागब्भा व अंधकवण्ही ह्यांचा मुलगा होता, असे म्हटले आहे. पण बापाचे नाव वसुदेव असे दिलेले नाही. ह्याहीवरून वासुदेव हे पैतृक नाव नसून तो काहीतरी अधिकार असावा असे वाटते. वर सांगितल्याप्रमाणे जैनांच्या संप्रदायामध्ये वासुदेव कल्पना काय आहे, हे कळते. जैन संप्रदाय हा बौद्ध धर्माच्याही आधीचा होता. भारतीय युद्धाच्या पूर्वीही जैन किंवा तत्सम पंथ असेल. त्यांच्या संप्रदायाप्रमाणे दैवी सामर्थ्य व कर्तबगारी असलेली ‘वासुदेव' पदवी मिळविणारी अशी व्यक्ती दर कालखंडात होऊन जाई असे दिसते.