पान:Yugant.pdf/181

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४ / युगान्त

 ज्या राजांना जिंकले असेल, त्या सर्वांना बोलावून त्यांचा पाहुणचार करायचा, त्यांचा सन्मान करायचा व त्यांना घरोघर पोहोचवायचे, ह्या त्या वेळच्या रूढीचे वर्णन धर्माच्या राजसूय यज्ञात केलेले आहे. हीच कल्पना परत कालिदासाने रघुवंशात सांगितलेली आहे. सर्व संपत्ती वाटता-वाटता स्वतः दरिद्री होऊन जायचे- इतके की, कोणाला मोठे दान करायचे सामर्थ्यदेखील राहू नये अशी अवस्था यायची. हा क्षत्रियाचा मोठेपणा समजला जाई. रघूविषयी लिहिताना अगदी हेच चित्र कालिदासाने उभे केले आहे. ‘अकिञ्चनत्वं मखजं व्यनक्ति'. रघुराजा यज्ञात दिलेल्या दानामुळे गरिबी भोगीत होता असे हे वर्णन आहे. निरनिराळ्या क्षत्रियकुलांचा वंशपरंपरागत आलेल्या आपल्या राज्यावरचा हक्क अबाधित असे. लढाईमध्ये त्यांची 'श्री' जाई; पराभव झाला की अपकिर्ती होई, व करभार द्यावा लागे. पराभवाचा अपमान व संपत्तीचा व्यय हे दोन्ही ‘श्री’ गेल्याचे लक्षण होते. भूमी मात्र कुणी कुणाची घेत नसे. समोरासमोर लढाई झाली की तीत एखादा राजा मारला जाई, पण पराभूत शत्रूला तुरुंगात टाकायचे किंवा मारायचे हा प्रघात नव्हता. ह्या जुन्या प्रघाताला जरासंधाने हरताळ फासला होता. जरासंधाच्या भयामुळे केवळ यादवच नव्हे, तर इतरही राजे राज्य सोडून गेल्याचे, किंवा दुसरीकडे त्यांनी राज्य स्थापन केल्याचे उल्लेख सभापर्वात येतात. जरासंध मगधाहून मथुरेपर्यंत आला होता. पण हस्तिनापूरच्या राजांना त्याचा उपद्रव झाल्याचे दिसत नाही. जरासंधाबद्दल धर्माला काहीच माहिती नाही. अशा तऱ्हेने कृष्णाला त्याला माहिती सांगावी लागते. ह्यावरून दुस-याही एका गोष्टीला पुष्टी मिळते,ती ही की कृष्णाचा व पांडवांचा संबंध द्रौपदीस्वयंवरापर्यंत आलेला नव्हता. तो आला असता, तर जरासंधाच्या भयाने आपण कसे पळून गेलो, ही कथा सांगण्याचे कारणच नव्हते.