पान:Yugant.pdf/180

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त/१६३
 

 कृष्णाने धर्माला हेच सांगितले. “तू सम्राट म्हणून सगळ्यांना पसंत पडशील. जरासंध जिवंत असेपर्यंत मात्र ते पद तुला मिळणे शक्य नाही.” जो राजा राजसूय यज्ञ करील, त्याला जर दहा राजांना जिंकावे लागले, तर इतर दहा राजे बरोबरीचे मित्र म्हणून असावे लागत. राजसूय यज्ञ हे जसे दिग्विजयाचे प्रतीक होते, तसे मान्यतेचेही प्रतीक होते. जवळजवळ तुल्यबल राजे एकमेकांच्या शेजारी राज्य करीत असत. कोणी राजसूय यज्ञ केला किंवा अश्वमेध यज्ञ केला, म्हणून हा समतोलपणा नाहीसा होत नसे. भीतीचा दरारा बसवून जरासंधाने ही घडी पार विस्कटून टाकली होती. बरोबरीच्या राजांना तुरुंगात टाकणे किंवा आपल्या सैन्याच्या जोरावर त्यांच्यावर दरारा बसवून साम्राज्य मिळवणे हे कृष्णाच्या मते तरी त्या वेळच्या क्षत्रियनीतीला धरून नव्हते.
 महाभारत-कालानंतर आपल्याला बौद्धकालातील वाङ्मय सापडते. त्यात काशी-कोसलांच्या साम्राज्याचे वर्णन आहे. त्यावेळी राज्यस्पर्धेमध्ये राजे लोक एकमेकांचा निःपात करण्यासाठी झटत असत व साम्राज्ये स्थापीत असत असे दिसते. बुद्धानंतर चंद्रगुप्त मौर्याने अशा तऱ्हेचे साम्राज्य स्थापले. त्यानंतर अशोकानेही तोच प्रकार केला. मागाहून आलेले कुमारगुप्त व समुद्रगुप्त वगैरेही साम्राज्यस्थापकच होते. शेजारच्या राजांची भूमी बळकावून आपल्या राज्याचा विस्तार करणे हे साम्राज्यस्थापनेचे सर्वमान्य तत्त्व झाले होते. तरीही गुप्तकालात होऊन गेलेल्या कालिदासाने जुन्या मूल्यांचा उच्चार रघुवंशात केलाच. रघूच्या दिग्विजयाचे वर्णन करताना तो म्हणतो, “श्रियं कलिङ्गनाथस्य जहार न तु मेदिनीम्', अगदी बरोबर हीच कल्पना महाभारतकालीही रूढ होती. दिग्विजय म्हणजे काही विशिष्ट मर्यादेत खेळलेला एक डाव होता. स्पर्धा कीर्तीसाठी होती, भूमीसाठी नव्हती. करभार घ्यायचा आणि तो दान म्हणून देऊन टाकायचा, स्वत:जवळ साठवून ठेवायचा नाही, असाही दंडक होता.मोठा दिग्विजय करायचा. सर्व राजांकडून खूप धन, रत्ने वगैरे मिळवायची आणि एक मोठा यज्ञ करायचा, व इतरांकडून जे त्यात आपली स्वतःची भर घालून सर्व संपत्ती दान करायची.