पान:Yugant.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६० / युगान्त

मुख्य कारण भारतीय युद्धात भीष्माचे वय नव्वदच्या वर जाऊ नये, हे ! एरवी दुसरी काही हरकत नव्हती. महाभारतामध्ये दोन माणसे भेटली,म्हणजे एकमेकांशी कसे वागावे, याचे अगदी काटेकोर नियम आहेत. लहानाने वडिलांना नमस्कार करायचा. बरोबरीच्यांना उराउरी भेटायचे, व लहानांना आशीर्वाद द्यायचा, अशी पद्धत होती. काही गोष्टी बरोबरीची माणसे एकमेकांत करू शकत असत. वडील माणसांच्या बरोबर किंवा लहान माणसांबरोबर तशा गोष्टी करण्याची शक्यता नव्हती. कृष्ण पांडवांना भेटायला येई, तेव्हा दर वेळेला कुंतीला, धर्माला व भीमाला नमस्कार करीत असे, आणि नकुल व सहदेव त्याच्या पाया पडत असत. अर्जुनाला मात्र तो आलिंगन देत असे. तेव्हा तो अर्जुनाच्या बरोबरीचा होता. खांडववनात ते वनविहाराला गेले, तेव्हा कोणा वडील माणसांना न घेता हे दोघे आपल्या बायका व दासदासी घेऊन गेले होते. बायकांचे दारू पिणे, नाचणे, गाणे वगैरे गोष्टी वडील माणसांच्या देखत कदापि झाल्या नसत्या. उद्योगपर्वात लढाईच्या आधी अर्जुनाच्या शिबिरामध्ये कृष्ण आणि अर्जुन दोघेही दारू पिऊन अर्जुनाचे पाय सत्यभामेच्या मांडीवर व कृष्णाचे द्रौपदीच्या, अशा तऱ्हेने बसले होते, असे संजयाच्या तोंडी वर्णन आहे. ह्या शिबिरामध्ये अभिमन्यू वगैरे मुलांना जाण्याला मज्जाव होता, असेही संजय सांगतो. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे अगदी बरोबरीचे जीवश्च कंठश्च मित्र होते.
 द्रौपदी-स्वयंवराच्या सुमारास यादव द्वारकेला जाऊन स्थिर झाल्याला फार काळ लोटलेला नसावा. यादव एका दिव्यातून पार पडले होते. पांडव अशाच तऱ्हेच्या कठीण दिव्यातून बाहेर निघत होते. ह्या वेळेला एकमेकांच्या आधाराने दोघांचेही हित साधणार होते. कृष्णाच्या धोरणी मनाला हा विचार शिवला नसेल, असे म्हणवत नाही. पांडवांच्या संबंधात कृष्णाने बरेच मोठे धोरण ठेवले होते, हे दिसून येते. पण कृष्णार्जुनांच्या वैयक्तिक मैत्रीत धोरणापेक्षा निर्व्याज प्रेमच जास्त दिसते.