पान:Yugant.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १५९
 

खिल्लारे ठेवलेली असत. हस्तिनापूरच्या राजाची तशी खिल्लारे होती, हे घोषयात्रेवरून दिसून येते. विराटाच्या राजाची तशाच तऱ्हेची खिल्लारे होती, हे विराटपर्वात दिसून येते. वर्षा-दोन वर्षांनी राजाने स्वतः जाऊन आपली खिल्लारे मोजून पहावीत; नवीन जन्मलेल्या जनावरांवर आपल्या स्वामित्वाची मुद्रा ठोकावी, असा प्रघात होता. यादव हे त्यावेळचे अतिशय श्रीमंत क्षत्रिय घराणे होते. तेव्हा त्यांचेही गुरांचे कळप मोठे असणारच. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी किंवा सुभद्रेच्या लग्नाच्या वेळी त्यांनी पांडवांना रथ, दासदासी, घोडे ह्यांबरोबर खूप गोधनही दिले. सुभद्रेला इंद्रप्रस्थाला घेऊन येताना द्रौपदीच्या रागावर उपाय म्हणून अर्जुनाने एक युक्ती योजली. सुभद्रेला सुंदर ‘गोपालिका'-वेष देऊन ‘मी तुमची दासी आहे,' असे म्हणत द्रौपदीकडे पाठविले. ह्या एका ठिकाणी गोपाल कन्यकेचा उल्लेख आलेला आहे. पण त्यातही असे दिसते की, पांडवांच्या पट्टराणीला भेटायला जाताना तोऱ्याने न वागता नम्रता दाखवण्यासाठी एका खालच्या वर्गातील स्त्रीचा म्हणजे गौळवाड्यातील गौळणीचा वेष सुभद्रेला दिला.
 त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे कृष्णाने बऱ्याच बायकांना जिंकले होते. अर्जुनाशी गप्पा मारताना यमुनेच्या काठी दोघे मित्र जे बोलले, ते एकमेकांनी केलेल्या पराक्रमाबद्दल; आणि तो पराक्रम लढाईतला व प्रेमातला (विक्रान्तानि रतानि च।) असा होता. पण ज्याप्रमाणे अर्जुन पुष्कळ स्त्रिया जिंकूनही स्त्रीलंपट नव्हता,त्याचप्रमाणे कृष्णही स्त्रीलंपट नव्हता. किंबहुना, निरनिराळ्या स्त्रियांना जिंकणे हा प्रेमापेक्षा राजकारणाचाच एक भाग होता.
 कृष्णार्जुनांच्या मैत्रीचा आरंभ द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झालेला असावा. इथे परत एकदा निरनिराळ्या लोकांची वये काय असावीत, असा प्रश्न उपिस्थत होतो. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अर्जुनाचे वय कमीत कमी वीस वर्षांचे असावे, असे आपण म्हटले आहे. ते सहज पंचवीसापर्यंत नेणे शक्य आहे. अर्जुनाचे वय जास्त न धरण्याचे