पान:Yugant.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८ / युगान्त

वेळी उघड होतात. कृष्ण जरी प्रत्यक्ष लढला नाही, तरी कृष्णाच्या बाजूचे यादव पांडवांच्या बाजूने लढत होते व दुसरे कित्येक यादव दुर्योधनाच्या बाजूने लढत होते. वर सांगितल्याप्रमाणे बलराम आपल्यापुरता अलिप्त राहिला.
 कृष्णाच्या बायकांमध्ये सत्राजिताची मुलगी सत्यभामा ही महाभारतात प्रामुख्याने येते. कृष्ण ज्यावेळी सपत्नीक पांडवांना भेटावयास आला, त्यावेळी त्याने सत्यभामेला बरोबर आणले होते. वनपर्वामध्ये सत्यभामा त्याच्याबरोबर होती. उद्योगपर्वामध्ये युद्धाच्या छावण्या पडल्या होत्या, तेव्हाही अर्जुनाच्या शिबिरात कृष्णाबरोबर सत्यभामा होती.
 रुक्मिणीचे फक्त नाव मात्र एक-दोनदा येते. रुक्मिणी ही कृष्णाची विशेष आवडती राणी होती, असे पुढील वाङ्मयात येणारे उल्लेख महाभारतात कुठेही नाहीत. किंबहुना, अमकीचा नवरा म्हणून पुरुषाचे वर्णन करण्याची प्रथाच महाभारतात नाही. इंद्रप्रस्थाचे राज्य कृष्णाचा पणतू वज्र या रुक्मिणीच्या नातवाच्या मुलाला दिले. पण अर्जुनाने राज्य दिले, ते कृष्णाच्या आवडत्या राणीचा तो पणतू म्हणून नव्हे, तर कृष्णाचा उरला-सुरला वंश म्हणून. वज्राचा आजा प्रद्युम्न व सात्यकी हे अर्जुनाचे मित्र व अर्जुनाच्या शौर्याचे पूजक, म्हणजे जवळजवळ भक्तच होते, असा उल्लेख महाभारतात ठिकठिकाणी आलेला आहे. तेव्हा अर्जुनाने ह्या दोघांच्या वंशजांस राज्ये दिली असेही म्हणता येईल. ह्या घटना रुक्मिणी ही कृष्णाची लाडकी होती व त्यामुळे तिच्या वंशाला मिळाले, असा प्रकार काडीमात्र नाही.
 महाभारतात जो कृष्ण दाखवला आहे, त्यात गोपीवल्लभत्वाचा मागमूसही नाही. त्या वेळच्या सर्वच क्षत्रिय राजांच्या संपत्तीमध्ये गोधनाचा समावेश होई. राजाची स्वत:ची अशी खिल्लारे असत. राजाने नेमलेले गवळी असत. राज्याच्या सीमेलगत शेतीखाली जमीन संपून अरण्याला जेथे सुरवात होई. त्या प्रदेशामध्ये ही