पान:Yugant.pdf/174

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १५७
 

 महाभारतामधील वर्णनावरून यादव हे बलशाली, श्रीमंत, बरेच दांडगे, स्वभावाने तापट, चटकन शस्त्राला हात घालणारे, आपल्याच ऐटीत असणारे, रथविद्येत निपुण असे लोक होते, असे दिसते. त्यांच्या श्रीमंतीचे वर्णन बऱ्याच ठिकाणी येते. यादवांतल्या यादवांत पक्षोपपक्ष होते. एका पक्षाचे मत कृष्णाने राजा व्हावे, असे होतेसे दिसते. पण कृष्णाच्या विरुद्ध बाजूलाही पुष्कळ लोक हाते; आणि कुळातल्या कुळात भांडणे नकोत, म्हणून कृष्णाने वसुदेवाचा सगळ्यांत थोरला मुलगा व आपला सावत्र भाऊ बलराम ह्याला राजा केले. बलराम आणि कृष्ण यांच्यामध्ये प्रत्यक्ष स्पर्धा जरी नव्हती, तरी पुष्कळच मतभेद होते. कृष्णामुळे आपण राजे आहोत, ही गोष्ट बलराम बहुतेक करून जाणून असावा. पण काही बाबतीत इच्छा नसूनही त्याला कृष्णाच्या पुढे नमावे लागे. अर्जुनाने कृष्णाच्या मदतीने व सल्ल्याने सुभद्रेला पळवली. क्षत्रिय रूढीप्रमाणे सुभद्रचे स्वयंवर झाले असते, पण कृष्णानेच अर्जुनाला सांगितले की, "बाबा, या पोरी स्वयंवरात कोणाला माळ घालतील, याचा नेम नाही. तुला ती हवी आहे ना, मग मी तुला माझा रथ देतो, त्यात तिला घाल व पळवून घेऊन जा." ह्याप्रमाणे अर्जुन गेला, तेव्हा बलरामसुद्धा सर्व यादव-वीर अर्जुनाचा पाठलाग करून त्याला मारावयाला निघाले होते. पण कृष्णाने चार गोष्टी जागून त्यांना परावृत्त केले व पांडवांचा व आपला संबंध जमणे ही कशी फायद्याची गोष्ट आहे. हे त्यांना पटवून दिले. कृष्णाचा पांडवांकडे अतिशय ओढा होता. बलरामाला पांडवांबद्दल सदिच्छा होती, पण ओढ नव्हती. कौरव व पांडव या दोघांबाबत तो कोठच्याच एका बाजूचा नव्हता. युद्ध सुरू झाले, तेव्हा या भानगडीत पडायलाच नको, म्हणून तो अलिप्त राहिला होता. युद्धाच्या वेळी दुर्योधनाला भीमाने मांडीवर म्हणजे कमरेखाली गदा मारली, म्हणून तो भीमाला मारायला उठला होता. पण कृष्णाने त्याला आवरले.