पान:Yugant.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १५५
 

न घेता लपत-छपत धर्माच्या पाठीमागे जाऊन पांडवांच्या राहण्याचे ठिकाण हुडकून काढले. ते उभयता कुंतीला व पांडवांना भेटुन, त्यांचे ठिकाण कोणाला सापडू नये, ह्या बुद्धीने फार थोडा वेळ थांबून गुपचूप परत आले.
 ह्या भेटीनंतर मात्र महाप्रस्थानपर्व वगळून श्रीकृष्ण नाही, असे एकही पर्व महाभारतात नाही. श्रीकृष्ण नव्हता अशा वेळात धर्मराजाने द्यूत खेळून राज्य गमावले. बारा वर्षांच्या वनवासात पांडवाचा आणि कृष्णाचा संबंध फारसा आला नाही; पण कृष्ण त्यांच्या पाठीमागे उभा होता. विराटपर्वामध्ये गोग्रहणाच्या वेळी पांडवांनी कौरवांना पळवून लावले. ह्या अपवादाखेरीज ज्यात श्रीकृष्णाची मदत नाही, अशी मोठी कृत्ये पांडवांचे हातून झाली नाहीत. द्रौपदी-स्वयंवरात यादव मोठा आहेर घेऊन आपल्या लवाजम्यानिशी द्रुपदाच्या राजधानीला आले. द्रुपदाच्या व यादवांच्या बलशाली युतीमुळे पांडवांना राज्यार्ध देणे धृतराष्ट्राला भाग पडले. कृष्णाने उघडपणे हा पुरस्कार केला नसता, तर एकट्या द्रुपदाच्या बळावर सहजासहजी पांडवांना राज्य मिळते ना!
महाभारतात लिहिले आहे की, धृतराष्ट्राने युधिष्ठिराला खांडववन व त्यातले खांडवप्रस्थ गाव दिले आणि कृष्णाला पुढे करून पांडव खांडवांच्या अरण्यात शिरले. तेथे त्यांनी कृष्णाच्याच मदतीने खांडवप्रस्थ या लहान गावाचे मोठ्या राजधानीत रूपांतर केले.एवढेच नव्हे, तर खांडववन जाळून कृष्णाने व अर्जुनाने मोठा प्रदेश प्रजेसाठी मिळवून दिला. हे सर्व झाल्यावर मयाकडून मोठा राजवाडा बांधण्याची तजवीज करून कृष्ण द्वारकेला निघून गेला.
 कृष्ण गेल्यावर निरनिराळे लोक धर्मराजाला भेटायला आले. त्यांचे बोलणे ऐकून आपण राजसूय यज्ञ करवा, असे धर्माच्या मनात आले.त्या वेळी कृष्णाला बोलावणे पाठवून धर्माने आपला बेत कृष्णाला सांगितला आणि कृष्णाने त्यावेळी राज्य करीत असलेल्या निरनिराळ्या राजांची माहिती देऊन कोण अनुकूल,