पान:Yugant.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त /१५१
 

शस्त्ररंगात कर्णाच्या द्वंद्वयुद्धाच्या मागणीमुळे ‘तू कोण?' हा प्रश्न कृपाने विचारला व कर्णाला मान खाली घालावी लागली. शेवटचा प्रसंग विद्येचे प्रदर्शन नसून खरेखुरे युद्ध होते. जे द्वंद्व त्याने अर्जुनाजवळ मागितले, ते त्याला आयते मिळाले होते. हा काही खेळ नव्हता. दयामाया न दाखवता लढलेल्या युद्धाचा हा एक भाग होता. शक्य तर मारायचे, नाहीतर वीरमरणाने मरायचे, ह्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. जन्मभर ज्याच्याशी हाडवैर केले, स्पर्धा केली, तो प्रतिस्पर्धी म्हणून समोर होता. त्याच्यासमोर कसलीही याचना करावयास नको होती. क्षात्रवृत्तीने मरणे हा एकच मार्ग होता. परत एकदा नको ते कर्णाने केले. त्याने धर्मयुद्धाची अपेक्षा केली व आता कृपाने नव्हे, पण कृष्णाने ‘तू कोण,' म्हणून धर्माची अपेक्षा करावीस, हे विचारले, 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा स्वतःशी उलगडा न करता कर्ण गेला.

 ऑक्टोबर, १९६६