पान:Yugant.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५० / युगान्त

चाक काढीत भूमीवर उभा आहे. तू रथात आहेस. तू युद्धनीती जाणतोस. रथातून माझ्याशी लढू नकोस. मला चाक काढू दे. धर्माने युद्ध कर"
 पण कृष्ण त्याला उसंत द्यावयाला बिलकूल तयार नव्हता. ‘धर्माने युद्ध कर' ह्या आव्हानातच कर्णाला पुरते नेस्तनाबूद करून टाकावयाचे साधन त्याला मिळाले. 'मी कोण?' हा प्रश्न कर्ण आता विचारीत नव्हता; पण कृष्णाने विचारलेल्या प्रश्नांचा रोख ‘तू कोण?' हाच होता. “भर सभेत द्रौपदीचे वस्त्र फेडायला लावलेस, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म? कर्णा, विरथ अभिमन्यूला तुम्ही सर्वांनी मिळून मारला, तेव्हा कुठे होता तुझा धर्म ?"
 अर्जुनाचा मोह नाहीसा करून स्वत्वाची जाणीव देऊन त्याला कर्तव्य करायला उभे केले कृष्णाने. त्याच कृष्णाने मरणाच्या घटकेला कर्णाचे स्वत्व सर्वस्वी हरण केले. “द्रौपदीला साधी माणुसकी तू दाखवली नाहीस, मग तुला का दाखवावी? सौभद्राच्या बाबतीत तू कुठे क्षत्रियधर्म पाळलास? कसल्या धर्माची तुला अपेक्षा आहे ? ती अपेक्षा असावी, असे तू वागलास का?" हेच ते विदारक प्रश्न होते. कृष्णाने दोनच प्रश्न विचारले. इतर भाकड प्रश्न संशोधित आवृत्तीत गाळले आहेत. एका बाजूने कर्णाला धर्माची याचना करायचा अधिकार ह्या प्रश्नांनी नष्ट केला, तर दुसऱ्या बाजूने ज्या दोन कृत्यांनी अर्जुनाला खोल जखम झाली होती, त्यांचा उच्चार झाला. ह्याच माणसाने माझ्या बायकोची भर सभेत विटंबना केली; ह्याच माणसाने माझ्या मुलाला निर्दयपणे मारले, ह्याची अर्जुनाला आठवण झाली, तो त्वेषाने उठला. त्याने बाण जोडला व तो गर्जून म्हणाला, “जर खरा क्षत्रिय असेन, तर हा बाण कर्णाचे प्राण घेईल' अर्जुन अचूक नेम धरणारा म्हणून प्रसिद्ध होता. ह्याही वेळी त्याचा नेम चुकला नाही.
 कर्ण महाभारतात शस्त्ररंगाच्या वेळी आला. त्यावेळी झाले घटनांची एक प्रकारे ह्या शेवटच्या प्रसंगी पुनरावृत्ती झाली.