पान:Yugant.pdf/167

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १४९
 

 ह्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधी वर्णने आहेत. एकदा म्हटले आहे, नेम चार अंगुळांनी चुकला. शल्याचा इशारा बरोबर धरला, तर इतक्या थोडक्यात नेम चुकणार, ते शल्याला कळले असे होते, व कर्णाची नेमबाजी बरोबर नव्हती असे सिद्ध होते. उलट कर्णाचा अमोघ बाण येतो आहे, हे पाहून कृष्णाने रथ दाबला व घोड्यांनी गुडघे टेकले व बाण चोवीस अंगुळांनी चुकला, असेही वर्णन लगेच केले आहे. हे वर्णन केवळ कृष्णस्तुतीकरिता लिहिले आहे, असे ह्या पर्वाचे संपादक म्हणतात, ते बरोबर वाटते. कर्ण गळ्याचा वेध घेत होता. चोवीस अंगुळांनी वेध चुकला, तर किरीट पडलाच नसता; म्हणून अर्जुन वाचला तो कृष्णाच्या कौशल्याने नव्हे, तर कर्णाच्या चुकलेल्या नेमबाजीने, ही वस्तुस्थिती वाटते. मुलाच्या मरणाने कर्ण खचला असेल आणि आता नेम चुकला, त्यामुळे तो जास्तच गोंधळात पडला. एवढ्यात चाक फिरले, रथ घसरला व चाक जमिनीत रुतले.
 लढाईचा हा सतरावा दिवस होता. हत्ती, घोडे व योद्धे ह्यांची प्रेते व मोडके रथ रणभूमीवर पडलेले होते. एवढ्या रणकंदनाने जमीन मऊ झालेली होती. कुठे-कुठे ओली झालेली असणार. गंगायमुनांच्या खोऱ्यात दगड नाहीच, हजार फूट खोल मातीच आहे. पण पाण्याचा निचरा होत नाही. अशा परिस्थितीत चाक फिरले व रथ रुतला, तर नवल काहीच नाही. युद्धाचे दोन आठवडे ह्या ना त्या निमित्ताने रथ निकामी होत होते, व योद्धे एक रथ सोडून दुसऱ्यात बसत होते. कर्णाच्याही पाठीमागे रथ होते, पण कर्ण रथाबाहेर येऊन मातीत फसलेले चाक बाहेर काढू लागला. जड रथाचे फसलेले चाक बाहेर काढणे- विशेषतः एकट्या-दुकट्याला म्हणजे वेळ खाणारे व श्रमाचे काम होते. कर्ण दुसऱ्या रथावर का बसला नाही? संध्याकाळ होत आली होती. ह्या युक्तीने वेळ काढून एका रात्रीची उसंत मिळवण्याचा त्याचा बेत होता का? तो गोंधळला होता, हे खरेच.