पान:Yugant.pdf/166

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४८ / युगान्त

 ह्या भांडणात कर्ण फारच संतापला, हे पाहून शल्यानेच संभाषण थांबविले व त्याला युद्धभूमीवर आणले. येथेही सारथी व रथी ह्यांचे संबंध कर्ण नीट जाणत नव्हता असेच म्हणावे लागते. नवे, पांढरे घोडे आणणे हाही भाग प्रक्षिप्त नसल्यास वेड्यासारखाच वाटतो. आपले घोडे, आपला रथ व आपला सारथी हे सर्वच ओळखीचे, नेहमीचे असावे लागतात. सर्वांनी मिळून लढावयाचे असते, ही गोष्ट कर्ण विसरला का? काहीही असो. कर्ण सेनापती म्हणून लढाईत पडला, तो पहिलेच पाऊल त्याने चुकीचे घातले, असे म्हणावे लागते. पुढच्या हकीकतीवरूनही शल्य कर्णाच्या विरुद्ध शत्रुत्वाने वागला, असे दिसत नाही.
 खूपसा आरडा-ओरडा करूनही कर्ण लागलीच अर्जुनाला सामोरा गेला नाही. भीम, धृष्टद्युम्न व अर्जुन हे रणात हाहाकार करीत होते. कर्णही लढाईत उतरला. थोड्या वेळाने शल्याने त्याला लांबून अर्जुनाचा रथ दाखविला. “दुर्योधनाने जन्मभर तुझ्यावर उपकार केले, ते फेडण्याची संधी आज आली आहे." असे म्हणून शल्याने रथ हाकला. ह्यावेळी कर्णाचा मुलगा वृषसेन अर्जुनावर चालून गेला व अर्जुनाने थोड्याच वेळात कर्णाच्या देखत कर्णाच्या पुढ्यात त्याला मारले. ह्या वेळेपर्यंत कर्णाचा घोष थांबला होता व अर्जुन घोष करू लागला होता. मुलगा मेलेला पाहून कर्णाच्या डोळ्यांत पाणी आले; पण ते पुसून तो अर्जुनापुढे उभा राहिला. दोघांचे युद्ध झाले, पण अर्जुनाची हळूहळू सरशी होत होती. कर्ण रक्ताने माखला होता. त्याचे कवच फुटले होते. त्याने अर्जुनाला ठार मारण्यासाठी एक अमोघ बाण काढला. त्या बाणाच्या अग्रावर नाग बसले होते. (नागविष लावलेले होते, म्हणून बाण थोडा जरी रुपला, तरी मनुष्य मरणार, अशा तऱ्हेचा हा बाण होता का?) कर्णाने नेम धरला. शल्याने सांगितले, “बाबा, नेम चुकला आहे. हा बाण अर्जुनाचा गळा वेधणार नाही." पण कर्णाने शल्याचे न ऐकता धनुष्य ओढले. चार अंगुळांनी नेम चुकून बाण अर्जुनाच्या किरीटाला लागला.