पान:Yugant.pdf/165

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त/१४७
 

 हे ऐकून शल्याने कर्णाला डिवचले की, “बाबा, व्यर्थ बडबड करू नकोस आतापर्यंत अर्जुनाने तुला हात दाखवला आहे. घोषयात्रेत काय केलेस? विराटाच्या गोग्रहणाच्या वेळी काय केलेस? अर्जुन दिसला की नांगी टाकशील" धर्म अर्जुनाला बोलला, त्यापेक्षा हे निराळे नव्हते. ह्याच पर्वात अश्वत्थाम्याशी लढाई करताना अर्जुन जेरीस आला होता, तेव्हा कृष्णही त्याला अतिशय तुच्छतेने टाकून बोलला होता व ते ऐकून अर्जुन चेव येऊन लढला होता. रथिसारथी ह्यांच्या परस्पर संबंधाचेच हे द्योतक असेल का? हे बोलणे तेजोभंग करणारे नसून लढवय्याला राग आणणारेच वाटते.
 ह्याच्यापुढचे शल्य-कर्णाचे संभाषण मात्र गैरलागू, भारतातील कथेला सर्वस्वी विसंगत, मागाहूनच्या पुराणांतील रूढ कल्पनांनी भरलेले व म्हणून प्रक्षिप्त व मागाहून घुसडलेले वाटते. कर्णाने शल्याला त्याच्याच शब्दांत उत्तर द्यायचे सोडून मद्र व बाल्हीक देशातील स्त्रिया कशा अनाचारी आहेत ह्याचेच वर्णन केले आहे. त्याने गांधारालाही नावे ठेवली. सर्व देश आचारभ्रष्ट आहे असे म्हटले आहे. शेवटी तर “शल्या, तू कुलीन नाहीस, तुझे डोके उडवीन.' असे तो म्हणाला. कर्ण कितीही उतावळा झाला, तरी तो असे बोलणे अशक्य होते. त्याचा जन्म कौरवांच्या दरबारात गेलेला होता. कुरूंचे व मद्रांचे संबंध त्याला चांगले माहीत होते. दुसरे असे की मद्र, बाल्हीक ही पश्चिमेकडची राष्ट्रे व अंग, वंग व कलिंग ही पूर्वकडची राष्ट्रे अनाचारी, अनार्य ही कल्पना पुराणांची आहे. पुराणकाळात कुरु-पांचालदेशाला काही विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले होते. हाच प्रदेश पुढे ‘ब्रह्मावर्त' नाव पावला. पण अशा तऱ्हेचा समज महाभारतात काडीमात्र दिसत नाही. सर्व कुरूंनी पश्चिमेकडच्या मुली केल्या होत्या व आपल्या मुली पश्चिमेकडे दिलेल्या होत्या. हे संभाषण म्हणूनच अगदी विसंगत अतएव प्रक्षिप्त वाटते.