पान:Yugant.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १४५
 

वाटत होती. आता कर्णाच्या मनात असते, तरी त्याला माघार घेता आली नसती. माघार घेण्याचा विचारही कर्णाला सुचला नाही. कर्ण सेनापती असतानाच्या पहिल्या दिवसात काही घडले नाही. दुसऱ्या दिवशी सारथी म्हणून शल्याची मागणी करणे त्याला सुचले. ह्या मागणीपायी त्याला बराच अपमान सहन करावा लागला.
 कर्णपर्वात विचार करायला लावतील, अशा घटना पुष्कळ आहेत. त्यातलेच एक हे तेजोभंगाचे प्रकरण. शल्य हा माद्रीचा भाऊ, व नकुलसहदेवांचा म्हणजे पर्यायाने पांडवांचा मामा. दुर्योधन त्याला पहिल्याने भेटला, म्हणून त्याने त्याच्या बाजूला मिळण्याचे व लढण्याचे कबूल केले म्हणे. मागाहून धर्म आला. त्याला त्याने सांगितले, “काय करावे ? दुर्योधन पहिल्याने आला. मला ‘नाही' म्हणता येईना. पण कर्णाचे सारथ्य करून मी त्याचा तेजोभंग करीन व अशा तऱ्हेने आतून तुम्हांला मदत करीन.” हा सर्वच प्रसंग हे संभाषण अशक्य वाटते. कर्ण शल्याला सारथी म्हणून मागेल, ह्याचे काय शल्याला स्वप्न पडले होते? आतून शल्य पांडवांच्या बाजूचा होता. ह्याही देखाव्यात तथ्य नाही. कारण कर्णाच्या पाठोपाठ पांडवांनी त्यालाही मारलेच. मद्र देशालाच बाल्हिक, असे महाभारतात म्हटले आहे. हस्तिनापूरच्या घराण्याचा आणि बाल्हीकांचा संबंध खूपच जुना होता, शंतनूचा बाप जो प्रतीप त्याची एक राणी मद्रांची ऊर्फ बाल्हीकांची माहेरवाशीण होती. शंतनुचा एक भाऊ मामाघरी दत्तक गेला होता. त्याचा मुलगा वा नातू सौमदत्ती दुर्योधनाच्या बाजूने लढला व मेला. शल्याची सख्खी बहिण म्हणा, चुलतबहीण म्हणा, पांडुला दिली होती, म्हणजे वडील घराण्यांचा संबंध चालू राहिला होता. ज्याप्रमाणे इतर बाल्हीक दुर्योधनाच्या बाजूने म्हणजे वडील घराण्याच्या बाजूने लढले, तसा शल्यही लढला. कदाचित इतकी अटीतटीची लढाई होईल, अशी त्याला कल्पना नसेल. एवढे मात्र खरे की, तो पांडवांच्या विरुद्ध बाजूला होता व म्हणून जी घटना घडेल अशी त्याला कल्पना