पान:Yugant.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४४ / युगान्त

 ह्या प्रसंगी भीष्माचे म्हणणे द्रोणानेही उचलून धरले आहे. तो म्हणतो, प्रत्येक लढाईत हेकेखोर,पळून जाणारा(?) दयाशील व चुका करणारा असा हा कर्ण असल्यामुळे माझ्या मतेही तो अर्धरथीच आहे. (रणे रणेऽतिमानी च विमुखश्चैव दृश्यते। घृणी कर्णः प्रमादी च तेन मेऽर्धरथो मतः।।) द्रोण शस्त्रास्त्रे शिकवणारा होता. भीष्माचे नाही, तर द्रोणाचे मत विचारात घेऊन आत्मशोधन करण्याची कर्णाला शक्यता होती. माझ्या बुद्धीचे व शरीराचे बळ असूनही परिस्थितीमुळे मला रथविद्या व शस्त्रविद्या संपादन करता आली नाही. ही जाणीव कर्णाला झाली असती; आपल्या कर्तृत्वाच्या मर्यादा कबूल कराव्या लागल्या असत्या; पण कर्ण आत्मशोधन करणारा नव्हता. 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा खोल विचार करणारा नव्हता.
 भीष्म पडल्यावर कर्ण रणांगणात उतरला. आता तो सेनापती होणार, असे वाटू लागले. 'आम्हांला कर्ण सेनापती हवा. आम्हाला कर्ण सेनापती हवा,' म्हणून सैन्याचा घोष चालला होता. कर्णही मोठ्या रथात बसून वैभवाने रणभूमीवर आला. पण ‘सर्वांना पसंत पडेल, अशा माणसाला म्हणजे द्रोणाला सेनापती कर,' म्हणून त्यानेच दुर्योधनाला सल्ला दिला. द्रोणाच्या आधिपत्याखाली हमरीतुमरीचे युद्ध झाले व दोन्हीकडचे मोठे वीर कामास आले. ह्या तीन दिवसांत अर्जुनाला मारावयाची संधी कर्णाला मिळाली नाही,इतकेच नाही, तर इंद्राने दिलेली अमोघ शक्ती घटोत्कचावर चालवावी लागली. ह्या तीन दिवसांतच कौरववीरांनी पाचसहा जणांनी मिळून अभिमन्यूला, अर्जुनाच्या मुलाला विरथ करून मारले.
 द्रोण मेल्यावर युद्धाच्या सोळाव्या दिवशी कर्ण सेनापती झाला. दोन्हीकडची खूप हानी झाली होती; पण जयाचे पारडे पांडवांच्या बाजूला होते. ‘लढाई थांबव, संधी कर,' असे अश्वत्थामा दुर्योधनाला सांगत होता. दुर्योधन कर्णावर विसंबला होता. जे इतरांना साधले नाही ते कर्ण करील, अशी त्याला खात्री