पान:Yugant.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १४३
 

क्षत्रियत्व त्याला मिळाले व मित्रासाठी लीलेने त्याचा त्यागही केला. कर्ण असामान्यत्व पावला. ह्या एका क्षणाने कर्णाचे आयुष्य सफल झाले, असे म्हणता आले असते, पण ह्यानंतरच्या त्याच्या काही आठवड्यांच्या आयुष्यात त्याच्या जीवनाला नेहमीचे वळण परत मिळाले. कर्णाला इतरांनी खाली ओढले, व कर्ण स्वतःच्या कृत्यांनीही आपणहून खाली गेला.
 भीष्माने रथी कोण व अतिरथी कोण, ह्याची नोंद केली, त्यावेळी कर्णाला ‘अर्धरथी' म्हटले. कर्णाच्या उतावळेपणाचा उल्लेख करून त्यामुळे तो अर्धरथी आहे, असे भीष्म म्हणाला. भीष्माचे मत पात्रयत्व, सूतत्व अशा काही सामाजिक मूल्यांवर आधारलेले नव्हते. तो कर्णाचा स्वत:चा असा एक अवगुण दाखवत होता. कर्णाला राग आला, पण सर्व महाभारत विचारात घेता भीष्माचे मूल्यमापन बरोबर वाटते. रथी रथात उभा राहून युद्ध करणारा असे, त्याचप्रमाणे रथ हाकणाराही असे. कृष्णाला दोन्ही अवगत होते. तसेच अर्जुनाला व भीष्मालाही. कर्ण सूतांत वाढला, पण त्याने रथ हाकल्याचे वर्णन नाही. रथात बसून तो लढे, पण रथ चालवण्याची विद्या रथातून युद्ध करताना उपयोगी पडणारी असेल असे वाटते. चालत्या रथातून नेम धरावा लागे. त्यात कर्ण कच्चा होता, हे पुढील हकीकतीवरून दिसून येतेच.
 ह्या भांडणाची हकीकत सुसंबद्ध नाही. एके ठिकाणी म्हटले आहे की, 'मी सेनापती असेपर्यंत कर्णाने लढता कामा नये,' अशी अट भीष्माने घातली. भीष्माचे सेनापतिपद लढाई करण्यासाठी नसून लढाई थांबवायचा तो एक शेवटचा प्रयत्न होता, असे मी म्हटले आहे. तसे असेल तर भीष्माच्या दृष्टीने वरील अट सुसंगत वाटते. पण दुर्योधनाने ती बिनतक्रार कशी कबुल केली, ह्याचे नवल वाटते. दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, ‘भीष्म उभा असेपर्यंत मी लढणार नाही,' असे कर्ण रागावून म्हणाला. कर्णानेही असे म्हणणे त्याच्या स्वभावाला धरूनच आहे.