पान:Yugant.pdf/159

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १४१
 

 कुंती उत्तर देऊ शकतच नव्हती. कुंती त्याला गंगातीरी भेटली. त्याने आपली सूर्योपासना संपवून तिला नमस्कार करून येण्याचे कारण विचारले. तिने त्याच्या जन्माचा वृत्तान्त सांगितला, व “आता पांडवांच्या बाजूचा हो. तुझे ते भाऊ आहेत. कर्णार्जुनांचा प्रताप जगाला पाहू दे. तू सूतपुत्र नाहीस. प्रतापी हो" वगैरे त्याला सांगितले. (येथे मध्येच तीन श्लोक घुसडलेले आहेत. ते म्हणजे सूर्याने आकाशातून कर्णाला उद्देशून सांगितलेली वाक्ये.)
 कर्णाने उत्तर दिले, ते थोडक्यात व अगदी निर्वाणीचे असे आहे. त्या उत्तरातील एक ओळ मात्र नीट लागत नाही. ‘धर्मद्वारं ठिसूळ ममैतत्स्यान्नियोगकरणं तव' ही ती ओळ. नियोगाच्या हकीकतीमुळे मला धर्मद्वार मोकळे झाले, असा अर्थ होईल. 'नियोग' शब्दाचा अर्थ येथे नेहमीपेक्षा निराळा आहे. कर्ण म्हणाला,"बये, नियोगाची जी हकीगत सांगितलीस, त्यामुळे माझ्या धर्माचे द्वार मला मोकळे होईल, अशी तुझी कल्पना असली, तर चूक आहे. तुझ्या हकीकतीमुळे मला क्षत्रियत्व मिळाले, पण माझ्यावर कोणतेही क्षत्रियसंस्कार झालेले नसल्यामुळे हे क्षत्रियत्व कुचकामाचे आहे. जन्माच्या वेळी संस्कार व्हायचे, तेव्हा निर्दयपणे तू मला टाकून दिलेस. आज मात्र आप्पलपोटेपणाने माझ्याकडे आलीस. कृष्ण ज्याच्या पाठीशी आहे, त्या धनंजयाची भीती कोणास वाटणार नाही ? मी जर आज दुर्योधनाला सोडले, तर भीतीमुळे मी पांडवांना मिळालो, असे इतर क्षत्रिय म्हणतील. माझ्या जिवावर त्याने हे युद्ध मांडले आहे. जा, तू सांगतेस, ते कदापि होणे शक्य नाही. मात्र मी फक्त अर्जुनाला मारीन, इतर पांडवांना सोडून देईन. मला अर्जुनाने मारले. तर तुझे पाच आहेतच; मी अर्जुनाला मारले, तर मला धरून तुझे पाचच राहतील, जा." कुंती काय बोलणार? 'आपले वचन पाळ.' असे म्हणून ती निघून गेली. कृष्णाला दिले, तसेच हे उत्तर आहे. त्यात कुंतीचा धिक्कार आहे. तिच्या कृत्यामुळे आपल्या आयुष्याचे वाटोळे कसे झाले, तेही सांगितलेले आहे.