पान:Yugant.pdf/158

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४० / युगान्त


 दोहोपैकी एक प्रसंग कृष्णाने त्याला‘तू पांडवांच्या बाजूचा हो,' म्हणून गळ घातली तेव्हाचा; व दुसरा प्रसंग कुंतीने त्याला ओळख दिली तो. कृष्णाने कधी नव्हे, अशी आमिषे दाखवली. ज्यासाठी तो जन्मभर झगडला, ते सर्व व त्याने कल्पना केली असेल त्यापेक्षा कितीतरी जास्त त्याला देऊ केले. तो क्षत्रिय म्हणून सिद्ध होत होते; त्या वेळच्या उच्चतम कुळातला म्हणून त्याला मान मिळत होते; राज्य मिळत होते; ज्यांचा जन्मभर दुस्वास केला ते हात जोडून चाकर म्हणून उभे रहायची शक्यता होती. पण ह्या सर्वांवर कर्णाने पाणी सोडले. तेही सहज, विचार न करता, शिव्या न घालता, कृष्णाला काहीही दुरुत्तरे न बोलता. "कृष्णा, तू म्हणतोस ते अशक्य आहे. माझा जन्म सूतांमध्ये गेला. माझ्या व माझ्या मुलांच्या सर्व सोयरिकी सूतांमधल्या आहेत. मी आता त्यांच्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. राज्य मिळाले, तरी मी ते दुर्योधनाच्या पायाशीच वाहीन. जा, माझे मन वळवायच्या भानगडीत पडू नकोस"(ह्या भाषणानंतर कृष्णाची देव म्हणून स्तुती व पांडव कसे अजिंक्य आहेत, कौरवांचा वध होणार हे कसं नक्की ठरलेले आहे, अशा अर्थाचे एक लांबलचक वाक्य कर्णाच्या तोंडी घातलेले आहे ते अप्रस्तुत व मागाहून घुसडलेले असावे, असे वाटते.) 'नशीब तुझे' असे म्हणून कृष्ण निघून गेला. ह्या प्रसंगात कर्ण एक असामान्य व्यक्ती, खरा मित्र, दत्तक घराण्याला निष्ठेने, प्रेमाने बांधलेला पुरुष, कोणत्याही लाचेला बळी न पडणारा सेवक, अशा अनेक गुणांनी उठून दिसतो. इतर ठिकाणी दिसणारा उतावीळपणा, उखाळ्या-पाखाळ्या काढण्याची खुमखुमी ह्याचा या प्रसंगी मागमूससुद्धा नाही.
 दुसरा प्रसंग कुंतीशी जे संभाषण झाले तो. त्यात राग आहे. वैफल्याची धार आहे. पण त्यातही क्षुद्रपणा नाही. बोलणे कितीतरी लांबवता आले असते. कुंतीमुळे कर्णाला किती दु:खे भोगावी लागली, ह्याचे खूप वर्णन देता आले असते. पण सर्व प्रसंग अगदी थोडक्यात वर्णिला आहे. भाषण मुख्यतः कर्णाचेच आहे.